September 12, 2025

Maharashtra: महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, २९ मे २०२५: महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

महापालिका निवडणूकीच्या तयारीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकिला आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मंत्री पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.