September 24, 2025

महेश काळे यांच्या गायनाने वसंतोत्सवच्या तिसऱ्या दिवसाची सुमधुर सुरुवात

पुणे, दि. २१ जानेवारी, २०२४: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुमधुर गायनाने आज वसंतोत्सवच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली.

कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मस् या ठिकाणी हा महोत्सव सुरु असून पुनीत बालन समूह यांच्या विशेष सहकार्याने यावर्षीच्या १७ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पु ना गाडगीळ यांच्या अजित गाडगीळ, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावर्षी महोत्सवासाठी व्यंकटेश बिल्डकॉन प्रा लि-अंकुश असबे व्हेंचर, भारती विद्यापीठ, पु ना गाडगीळ अँड सन्स, सुहाना मसाले, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, गिरिकंद हॉलिडेज, खैतान अँड कंपनी, मॅस्कॉट, डॉन स्टुडीओ आणि एल अँड टी रियल्टी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आजच्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ गायक स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त तीन पुरस्कार प्रदान केल्या गेले. यावेळी ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी मीरा पणशीकर, ध्वनिमुद्रिका अभ्यासक संजय संत, आणि युवा हार्मोनियम वादक यशवंत थिट्टे या तिघांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कलाकार व संशोधक यांना मानपत्र व रोख ५१,००० रुपये तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २१,००० रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे बापू देशपांडे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महेश काळे यांनी राग मधुवंती ने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘एहो मोरे साई कवन…’ आणि ‘शिव आद मध अंत…’ ही झपतालातील रचना सादर केली. यानंतर त्यांनी तराना प्रस्तुत केला. उद्या अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठानचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, असे सांगत ‘जानकी नाथ…’,’ पायोजी मैने राम रतन धन पायो…’ ही भजने त्यांनी सादर केली.

महेश काळे यांना निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), प्रसाद जोशी (पखावज), अपूर्व गोखले (व्हायोलिन), रोहन वनगे (तालवाद्य), अमृत चनेवार, किशोरी आणि अंकुर चांदे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

अयोध्येत उभे राहत असलेल्या भव्य राम मंदिराचे औचित्य साधत महोत्सवामध्ये राहुल देशपांडे यांनी गायलेले एक विशेष गाणे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. समीर सामंत हे या गाण्याचे गीतकार असून त्याचे संगीत संयोजक सारंग कुलकर्णी यांनी केले आहे.

यानंतर स्व. पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक गायक राहुल देशपांडे यांचे गायन झाले. त्यांनी राग शंकराने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘ जानू रे जानू…’ हीविलंबित तीन तालातील पारंपरिक बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांची बंदिश सादर केली. राम निरंजन न्यारा रे… या कबीर भजनाने राहुल यांनी सादरीकरणाचा समारोप केला. राहुल देशपांडे यांना डॉ चैतन्य कुंटे यांनी संवादिनी, निखिल फाटक यांनी तबल्यावर साथ केली.

यावेळी बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, मी गेले काही दिवस नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. अनेक गोष्टी गायच्या आहेत, त्या जर गायल्याच नाहीत तर साठी नंतर असे वाटयला नको की आपण काही गायलोच नाही. ही खंत मला ठेवायची नाहीये म्हणून मी प्रयत्न करतोय. कट्यार काळजात घुसली हा त्यापैकीच एक प्रयोग होता. आणि म्हणूनच कट्यार…  करायचे धैर्य दाखवले. याचवेळी महेशची मैत्री झाली. कत्याराचे श्रेय माझ्यासाठी खूप जास्त आहे.
शास्त्रीय संगीताचा रियाज केला आता वेगळं काहीतरी करूया हेही त्यानंतर ठरवले. यातूनच मला शिकायची उर्मी मिळते, गाण्याची उपज सुधारते. वेगवेगळे गायन प्रकार हाताळता येतात असे वाटते. मला स्वतः ला बघायला ऐकायला आवडते ते मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.