माता रमाई मातृशक्ती पुरस्कार सुनीता सुनील लांजेकर जाहीर 

पुणे, 27/5/2022- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि स्वरुप-वर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ४ था माता रमाई मातृशक्ती पुरस्कार सुनीता सुनील लांजेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या दि.२७ मे,२२ रोजी होणाऱ्या ८७ व्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारामध्ये रोख रू.५,०००/- तसेच सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ इ.चा समावेश आहे.

 

सुनीता सुनील लांजेकर यांचे

शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून

उपजतच चित्रकला, भरतकाम इ. वर त्यांचे प्रभुत्व आहे. बेताच्या परिस्थितीत विविध अडचणींवर मात करताना त्यांनी या कलांचा वापर करून ऐतिहासिक पगड्या बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. अत्यंत अवघड परिस्थितीत कुटुंब गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मुलांना प्रेरणा दिली.पुढे परिस्थिती सुधारल्यावरही पगड्या बनविण्यात अधिक अभ्यास केला,जो आता विविध ऐतिहासिक वेशभूषांची अचूकता कशी असावी इथपर्यंत पोचला आहे. पतीच्या अपघाती निधनानंतर न डगमगता त्यांनी मुलांना उत्तम चारित्र्य, अपार कष्टाची तयारी, उत्कृष्ट व ऐतिहासिक साहित्याचे वाचन-चिंतन करण्याचा मनस्वी आग्रह तसेच अखंड ज्ञानलालसा उत्पन्न करण्याची असलेली त्यांची चिकाटी गोष्टी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

 

मातोश्री रमाई मातृशक्ती पुरस्कार निवड समितीतील सदस्य प्रा.डॉ.श्यामा घोणसे, प्रा.डॉ.प्रशांत साठे, प्राचार्य डॉ.गणेश राऊत, प्रा.डॉ.गौतम बेंगाळे, प्रा.डॉ. तानाजी हातेकर, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर कुंभार, प्रा.विजय रास्ते तसेच प्रा.डॉ.सुनील भंडगे यांनी सुनीता लांजेकर यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.