नाविण्यपर्ण संकल्पानांद्वारे एमबीएचे शिक्षण, विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी नवे नियम

पुणे, २/०६/२०२१: व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या संस्थांना विद्यार्थी क्षमता वाढवायची असेल तर यापुढे नावीण्यपूर्ण विषयांचे शिक्षण द्यावे लागणार आहे, असा नियम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घालून दिला आहे. पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एमबीएसाठी पाच नव्या एमबीएची रचना केली असून, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अभ्यासक्रम देखील तयार केला आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये एमबीएचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण व प्लेसमेंटची संधी यामुळे नामांकित संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. विद्यार्थ्यांच्या मागणीपेक्षा विद्यार्थी क्षमता (इंटेक) कमी असल्याने मोठी स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे संस्थांकडून विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी `एआयसीटीई’कडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेतली जाते. मात्र, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीईने नियमात बदल केल्याने क्षमता वाढीसाठी संस्थांना नवे बदल स्विकारावे लागणार आहेत.

शिक्षण संस्थांमध्ये एमबीएसाठी १२० अशी विद्यार्थी क्षमता आहे, पण त्यानंत ती १८० पर्यंत वाढवता येते. ज्या संस्थांना ‘एनबीए’चे मानांकन मिळाले आहे त्यांना ३०० पर्यंत क्षमता वाढवता येते.

‘‘एमबीएसची विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी ‘एआयसीटीई’ने नावीण्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना संस्थांना दिल्या आहेत. विद्यापीठाने पाच नवे एमबीए अभ्यासक्रम प्रस्ताविक केले आहेत. त्याचा सिलॅबस विद्या परिषदेने मान्यता दिली आहे. भविष्यात या वाढ देखील होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्याच स्पेशल विषयाच्या नावाने एमबीएची पदवी मिळेल. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना नावीण्यपूर्ण संकल्पनांवर शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हा बदल केला आहे.’’ – डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा

एमबीए करताना सध्या द्वितीय सत्रापासून फायनान्स, मार्केटींग, एचआर, रुरल बीझनेस, सप्लाय चेन, हेल्थ केअर, हॉस्पीटल मॅनेजमेंट आदी विषयांमध्ये स्पेशलायझेशन करावे लागते. पण यापुढे याच अभ्यासक्रमांसाठी क्षमता वाढवून मिळणार नाही. तर त्यासाठी नवे अभ्यासक्रम संस्थांना प्रस्तावित करावे लागणार आहेत व त्याच नव्या कल्पनांच्या नावान विद्यार्थ्यांना एमबीएची पदवी मिळेल. पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने पाच नाविण्यपूर्ण संकल्पना असलेल्या पाच अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. त्यानुसार हे नवे अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी संस्थांकडून ‘एआयसीटीई’कडे प्रस्ताव सादर केले आहेत.

एमबीएसाठी हे आहेत नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम
एमबीए- सर्व्हिस मॅनेजमेंट
एमबीए -सस्टनेबल मॅनेजमेंट
एमबीए- डिजीटल मार्केटींग
एमबीए – फिनटेक
एमबीए- प्रोजेक्ट मॅनेजमेंट