माध्यमांनी दबावाला शरण जाता कामा नये: शेखर गुप्ता

शितल विजापूरे
पुणे, २१ सप्टेंबर २०२२: प्रसार माध्यमांवर दबाव येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होत आहेत. पण या दबावाला धारा न देता विश्वासार्हता जपण्यासाठी पत्रकारांनी दर्जेदार वार्तांकन करणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारांनी गुगलचा वापर करणे धोकादायक आहे, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वार्तांकन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक, ‘द प्रिंट’ चे संस्थापक आणि संपादक शेखर गुप्ता यांनी केले.

‘सकाळ’ चे संपादक डॉ नानासाहेब परुळेकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे २० सप्टेंबर रोजी गुप्ता यांचे “माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ: वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, पुणे ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणवीस मंचावर उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, भारतातील माध्यमांना विकसित होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एका पत्रकाराने उत्साह आणि शंका घेऊन विचार करणे हे गुण जोपासने गरजेचे आहे. “माध्यम हे पूर्णपणे टेक्नॉलॉजी च्या सहाय्याने हाताळणे शक्य नाही. एखादी बातमी मिळवण्याकरिता टेक्नॉलॉजी चा वापर न करता, स्वत: जाऊन मेहनत केली पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. आजकाल बऱ्याच गोष्टींकरता पत्रकारही गुगल चा वापर करत आहेत, त्यामुळे ही गोष्ट पत्रकारांनी टाळायला हवी.
माध्यमे त्यांच्यावर असणाऱ्या दबावामुळे जर झुकली गेली तर जनतेच्या नजरेतून उतरतील आणि जर माध्यमांनी दबावाला थारा दिला नाही तर त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद होतील. परंतु जनतेचा माध्यमांवर असणारा विश्वास कायम ठेवण्याकरिता माध्यमांनी नेहमी उत्कृष्ट काम केले पाहिजे असे शेखर गुप्ता यांनी सांगितले.

आणीबाणी नंतर माध्यमांमध्ये क्रांती
भारतात सर्वात आधी राजकीय पक्षांची वर्तमानपत्रे अस्तित्वात आली. त्यानंतर काही इंग्रजी वृत्तपत्रे सुरु झाली. मात्र ‘१९७५’ च्या आणीबाणीनंतर भारतात खऱ्या अर्थाने माध्यमांची क्रांती झाली.
“मागील दोन वर्षांत वर्तमानपत्रे जवळपास बंदच होती. बंद असलेली ही वृत्तपत्रे परत सुरु झाल्यानंतर जनतेने तेवढ्याच विश्वासाने ती परत वाचण्यास सुरुवात केले. जनतेचा माध्यमांवर असलेला हा विश्वास ढासळू न देता काम करणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, ” असे गुप्ता म्हणाले.