एमटीडीसी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आणि पर्यटन सेवाविषयक प्रशिक्षण

पुणे, 19 एप्रिल 2021: संचारबंदीच्या काळात पर्यटक संख्या कमी होण्याची शक्‍यता गृहीत धरुन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आणि पर्यटन सेवाविषयक विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कोरोनाविषयक खबरदारी, प्रथमोपचार आणि उत्कृष्ट सेवा विषयक प्रशिक्षणाचा समावेश आहे.
करोना महामारी आणि या पार्श्‍वभूमीवर करण्यात येणाऱ्या संचारबंदीमुळे पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. एमटीडीसीने या महामारीनंतरच्या काळात पर्यटकांसाठी दीर्घकालीन उपाय योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यटन निवासातील पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्‍यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदीक काढा, व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.

महामंडळाने राज्यातील विविध रिसॉर्टवर, निवासी कक्षात(मागणीवरून)वायफाय सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम नेचरबरोबरच योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. यापुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा होईल. पर्यटकांना करोना संचारबंदीनंतर महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोना बाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येईल. त्यामुळे संचारबंदीनंतरच्या काळात पर्यटकांना बिनधास्त पर्यटन करता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागामध्ये खालील पर्यटक निवास सुरु आहेत.
महाबळेश्वर, माथेरान, माळशेज घाट, पानशेत, कार्ला (लोनावळा), कोयनानगर, भिमाशंकर तसेच किल्ले सिंहगड आणि अक्कलकोट पर्यटक निवास लवकरच सुरु होत आहेत.
सवलती –
जेष्ठ नागरिक यांना 20 टक्के पर्यंत सवलत,
शासकिय कर्मचारी यांना 10 टक्के सवलत,
आजी / माजी सैनिकांना 10 ते 20 टक्के सवलत,
ग्रुप बुकिंगसाठी 20 रुम्स बुक केल्यास 20 टक्के सवलत.