विज्ञान संशोधनात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे कनॉलेज क्लस्टर आणि बीसीआयपीएल यांच्यात सामंजस्य करार ; महिलांसाठी लवकरच ‘वी-ज्ञान’ शिष्यवृत्ती

पुणे, २४ मे २०२२ : महाराष्ट्रातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील मुलींना विज्ञान विषयक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने लवकरच ‘वी-ज्ञान’ ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी बीएएसएफ केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (बीसीआयपीएल) आणि पुणे नॉलेज क्लस्टर (पीकेसी) यांच्यात सामंजस्य करार झाला असून, पीएसए कार्यालयाच्या मदतीने हा उपक्रम

साकारला जात आहे.

याबाबत पुणे कनॉलेज क्लस्टर’च्या उपक्रम व्यवस्थापक डॉ. शिल्पा जैन म्हणाल्या,” वी-ज्ञान या शब्दातील ‘वी’ म्हणजे ‘वूमन इन एज्युकेशन’ तर ज्ञान म्हणजे ज्ञान. हा एक सर्वांगीण शिष्यवृत्ती उपक्रम आहे, जो राज्यातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील मुलींना रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर संशोधन प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करेल. या दोन वर्षांच्या उपक्रमांतर्गत अप्लाइड नॅचरल सायन्सेस, स्पेशॅलिटी केमिकल्स, अॅग्री-केमिकल्स, नवीन मटेरिअल्स आणि सस्टेनेबिलिटी या विषयांमधील संशोधन प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील महिला उद्योजकांना, सहा महिन्यांसाठी निर्वाह निधी आणि तसेच उद्योगांच्या संवर्धनासाठी पाठिंबा दिला जाईल तसेच प्रोटोटाइपिंग करिता देखील अनुदान पुरविले जाणार आहे.या महिलांची निवड पीकेसीकडून केली जाईल.”

पदवी (बीएससी / बीटेक / बीई / बी फार्म) किंवा पदव्युत्तर पदवीचे (एमएससी / एमटेक / एमई/एम फार्म) शिक्षण घेणाऱ्या किंवा पूर्ण केलेल्या महिला या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर १ जून ते ३० जून २०२२ दरम्यान ह्या उपक्रमासाठी अर्ज करता येईल. अर्जदाराने आपल्या अर्जासोबत प्रकल्प प्रस्ताव किंवा प्रकल्प मार्गदर्शिकद्व्यारे पडताळलेली कल्पना असणे आवश्यक आहे. प्रोटोटाइपिंग अनुदानासाठी, महिला उद्योजकाने, उत्पादनासाठी कल्पना/कल्पनेच्या पुराव्यासह अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराने वार्षिक उत्पन्न किंवा नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र यापैकी जे काही लागू असेल त्याबद्दल तपशील सादर करणे आवश्यक आहे. याबाबतचा अधिक तपशील https://pkc.org.in/programmes/programme_info/44/ ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.