December 2, 2025

‘पुणे ग्रँड टूर २०२६’ ला परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता; ३५ देशांच्या सहभागाला हिरवा कंदील

पुणे, २० नोव्हेंबर २०२५: आगामी ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी ३५ देशांच्या प्रतिनिधी आणि खेळाडूंच्या सहभागाला अधिकृत ‘ना-हरकत’ देण्यात आली आहे.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकल संघटना—युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय) —ची अधिकृत मान्यता मिळाली असून स्पर्धा त्यांच्या दैनंदिनीत समाविष्ट करण्यात आली आहे.

भारतासह अल्बानिआ, अल्जेरिया, अमेरिकन समोआ, ऑस्ट्रेलिया, बहारिन, बल्गेरिया, बुर्किना फासो, चीन, झेक रिपब्लिक, इस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, गुआम, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मलेशिया, मालदीव्ज, मंगोलिया, मोरोक्को, नेदरलँड्स, नायजेरिया, फिलीपीन्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, स्वीडन, स्वीत्झर्लंड, थायलंड, युएई, युके आणि यूएसए या देशांनी या स्पर्धेसाठी नामांकन केलेल्या प्रतिनिधींना परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र मंत्रालयाकडून सीएफआयच्या महासचिवांना पाठविण्यात आले आहे.

व्हिसा नियमांचे पालन, आवश्यक मान्यता आणि आयोजकांकडून पाठविलेल्या निमंत्रण पत्रांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे स्पर्धेत उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचा सहभाग वाढण्याची शक्यता असून, क्रीडाप्रेमींना जागतिक दर्जाचे कौशल्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे.