पुणे शहर आणि राज्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी सूचना पाठवा, आमदार शिरोळे यांचे आवाहन

पुणे, ८ जुलै २०२२ : राज्यामध्ये सत्ता बदल होताच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे सक्रिय झाले आहेत. पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नागरिकांना सूक्ष्म पद्धतीने नियोजन कसे करावे याबद्दल सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

राज्य आणि शहर याच्या सूक्ष्म नियोजनासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींनी सूचना पाठवाव्यात असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले असून, या सर्व सूचना राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आमदार शिरोळे यांनी ट्विट करून हे आवाहन केले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुण्याभोवतीच्या टेकड्यांचे रक्षण, शहरातील कचरा समस्या, नदी प्रदूषण, आरोग्य यंत्रणा याबाबत लोकांनी सुचविलेल्या अनेक सूचना मागील सरकारकडे मांडल्या होत्या. परंतु, त्या सरकारने या सूचनांकडे गांभीर्याने बघितले नाही. आता राज्यात सत्तांतर झाले आहे. नवे मुख्य मंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोघेही विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करणारे आहेत. त्यांच्यापर्यंत या सूचना पोहोचविल्या तर ते सूचनांवर योग्य ती अंमलबजावणी करतील, असा विश्वास वाटतो. याकरीता विविध संस्था, व्यक्ती यांच्याकडून शहर विषयक आणि राज्याच्या धोरण विषयक सूचना मागविल्या आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. अनेकांनी सोशल मीडियावरून या आवाहनाला भरघोस प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

हे आवाहन करतानाच डेक्कन जिमखाना परिसर समितीशी संवाद साधून त्यांच्याही काही कल्पनांविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. इंद्रनील चितळे यांच्यासह काही उद्योजकांशीही चर्चा केलेली आहे. पुण्याचे औद्योगिकीकरण, अर्थकारण यावरची त्यांची डॉक्युमेंट्स यावरही विचारविनिमय चालू आहे, हे सर्व एकत्रितपणे मुख्य मंत्री आणि उपमुख्य मंत्री यांच्यासमोर मांडले जाईल त्यातून शहर आणि राज्याच्या सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने हातभार लावला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.