शहरात अडीचशे पेक्षा जास्त अतिक्रमणाचे हॉटस्पॉट

पुणे, 7/7/2022 ः शहरात अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना कारवाई करण्यावर मर्यादा येत आहेत. कारवाई झाली की पुन्हा विक्रेते रस्ता, पादचारी मार्गावर पुन्हा अतिक्रमणे येत आहेत. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय निहाय तयार केलेल्या यादीत शहरात तब्बल २६४ ठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक ३७ ठिकाणांचा समावेश आहे. दिवसभर कारवाई करता यावी यासाठी आता फिरते पथक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त केले जाणार आहे.

महापालिकेकडून शहर फेरीवाला धोरणानुसार पथारी, स्टॉल, हातगाडी चालविण्यासाठी परवागनी दिली जाते. पुण्यात सध्या २१ हजार परवानाधारक व्यावसायिक असले तरी त्यापेक्षा किमान दुपटीने अनधिकृत व्यावसायिक रस्ता, पादचारी मार्ग, चौकात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिक्रमणांवर कारवाई केली जाते, पण ही कारवाई करण्यापूर्वी माल जप्त करण्यासाठी गाडी येत असल्याची कुणकूण व्यावसायिकांना लागते. त्यामुळे ते गडबडीने स्टॉल, पथारी, हातगाडी मुख्य रस्त्यावरून हटवतात व आतील गल्ल्यांमध्ये पळून जातात. दुकानाच्या बाहेर सामान ठेऊन अतिक्रमण करणारे व्यावसायिक सामान लगेच आतमध्ये घडतात. हे प्रकार शहरात सर्रास घडत असताना अतिक्रमण विभागाला त्यावर नियंत्रण आणता आलेले नाही.

शहरातील प्रमुख ४५ रस्ते व सुमारे दीडशे चौक पथारी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. पण हा आदेश फक्त कागदावरच आहे. शहरातील प्रमुख असो किंवा उपनगरांमधील मोठे रस्ते असो या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण व बेकायदा पथारी आहेत. यातून शहराचे बकालीकरण होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणाचे हॉटस्पॉट शोधण्यासाठी सर्वेक्षण केले असून, यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत तब्बल २६४ ठिकाणे निघाली आहेत. या ठिकाणी वारंवार अतिक्रमण होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतच आहे, शिवाय वादावादी, भांडणेही होत आहेत. त्यामुळे बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी फिरते पथक असणार आहे. यामध्ये दिवसात तीन चार वेळेला गाडी या रस्ते, चौकातून फिरणार असल्याने अतिक्रमण कमी प्रमाणात होईल असा दावा प्रशासनाने केला आहे.

ठिकाणे जास्त असण्याची शक्यता
अतिक्रमण विभागाने २६४ ठिकाणाची यादी तयार केली असली तरी त्यामध्ये काही ठिकाणी आख्ख्या रस्त्याचे नाव आहे. त्यामुळे एका रस्त्यावर ठरावीक अंतराने असे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे ही ठिकाणांची संख्या जास्त असू शकते. उदा. कल्याणीनगर ते विमाननगर सर्व परिसर, धायरी फाटा ते भैरवनाथ मंदिर धायरी गाव, कात्रज-कोंढवा संपूर्ण रस्ता, पूर्ण सासवड रस्ता असा उल्लेख आहे.

कोट
‘‘अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमण असणारे ठिकाणे कोणती याची १५ क्षेत्रीय कार्यालयानुसार यादी केली आहे. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी दिवसातून तीन ते चार वेळेला कारवाई करण्यासाठी फिरते पथक असेल. त्यामुळे बेकायदा व्यावसायिकांची संख्या आपोआप कमी होईल. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाईल.’’
– माधव जगताप, उपायुक्त अतिक्रमण विभाग

क्षेत्रीय कार्यालय आणि हॉटस्पॉट संख्या
नगर रस्ता – १२
येरवडा कळस – ११
ढोले पाटील – १३
औंध बाणेर – २३
शिवाजीनगर- घोले रस्ता- ३०
कोथरूड बावधन – ११
धनकवडी सहकारनगर – ११
सिंहगड रस्ता – १६
वारजे कर्वेनगर- १०
हडपसर मुंढवा- २५
वानवडी रामटेकडी – ९
कोंढवा येवलेवाडी – १३
कसबा विश्रामबागवाडा – ३७
भवानी पेठ – २३
बिबवेवाडी – २०