पुणे, २ सप्टेंबर २०२५: “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” अशा गजरात पुणेकरांनी सात दिवसांच्या गणरायाला मंगळवारी भावपूर्ण निरोप दिला. महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयींचा वापर करून तब्बल १८,७७१ गणेशमूर्तींचे विसर्जन शहरातील प्रमुख घाटांवर करण्यात आले. या वेळी २२,३१९ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेनुसार कृत्रिम विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश व मूर्तीदान केंद्र उभारले होते. एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८ कृत्रिम हौद, ६४८ लोखंडी टाक्या, ३३८ निर्माल्य कलश आणि २४१ मूर्तीदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच १५ प्रमुख घाटांवर फायरमन, सेवक, जीवरक्षक आणि पोलिस बंदोबस्त २४ तास तैनात होता.
सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार २११८ मूर्ती हौदात, १०,९१८ मूर्ती लोखंडी टाक्यांत तर ५७३५ मूर्ती नागरिकांनी दान केंद्रांत जमा केल्या. रात्रीपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
सात दिवसांची आकडेवारी
७१,५७३ गणेशमूर्तींचे विसर्जन (२७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर)
त्यात ११,०६९ हौदात, ४२,३९४ लोखंडी टाक्यांत, तर १८,११० मूर्ती दान केंद्रांत जमा
एकूण ७९,९९४ किलो निर्माल्य संकलित, त्यातील सर्वाधिक ९,२०० किलो कोथरुड-बावधन विभागातून
महापालिकेच्या या उपक्रमामुळे नदीपात्रातील प्रदूषण टळले असून, नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक ठरल्याचे प्रशासनाने सांगितले.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर