October 22, 2025

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची केली मागणी

पुणे,‌ १६ एप्रिल २०२५: राज्यसेवा मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलावी आणि कम्बाईन परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एमपीएससी विद्यार्थ्यांकडून या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ, आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी हे नाराज झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी आंदोलक विद्यार्थ्याने सांगितले की राज्यसेवा मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलावी आणि कम्बाईन परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. तसेच राज्यसेवा परीक्षा एक डिसेंबर २०२४ रोजी झाली असून १२ मार्च रोजी निकाल जाहीर झाले. त्यात मराठा समाजासाठी ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक’ (ईडब्ल्यूएस) यादीत समाविष्ट करण्यात आले. यामुळे मूळ ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र ठरले आहे. परिणामी त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची संधी मिळाली नाही.

सरकारने या मागण्या मान्य कराव्या यासाठी आजपासून हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.