कोंढव्यामध्ये महावितरण कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; फौजदारी गुन्हा दाखल

पुणे, २९ नोव्हेंबर २०२१: थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे कर्मचारी दशरथ अंबादास मुंडे हे सहकाऱ्यासमवेत गुरुवारी (दि. २५) शाह हाईट्स, भाग्योदयनगर, कोंढवा येथील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. यावेळी दोन थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून त्यांनी वीजमीटर ताब्यात घेतले असता आरोपी इरशाद शाह या व्यक्तीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच ताब्यात घेतलेले मीटर त्याने परत घेतले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरु आहे.