उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदलासाठी आणखी एक मैलाचा दगड पार करत MSFDA चे २३ नवीन सामंजस्य करार!

पुणे, दि. ६ ऑक्टोबर २०२२: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे आणि राज्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यात २३ नवीन सामंजस्य करार करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सांगितले. या निमित्तानी MSFDA आणि या सहयोगी संस्थांनी सादर केलेल्या निवेदनांविषयी मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी समाधान व्यक्त केले. मा. मंत्रीजी म्हणाले की, “वेगवेगळ्या तज्ज्ञ संस्थांना बरोबर घेऊन त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्याचे हे सर्वसमावेशक मॉडेल उचित आहे, कारण कोणतीही एकच संस्था एवढ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत जरी अवघड वाटली, तरी ती टिकते, आणि त्यात खरा आनंद असतो.”. “व्यक्ती – निर्माणाच्या या कामामध्ये आपली सर्व प्रकारे देखरेख व सहकार्य राहील”, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, MSFDA चे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, संबंधित शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे मान्यवर, आणि निमंत्रित शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षणामध्ये सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था कार्यरत आहे. या कामामध्ये – बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र (multidisciplinary curriculum and pedagogy), विविधता आणि समावेशकता (diversity and inclusion), इनोव्हेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान (Innovation and Cutting Edge Technology), नेतृत्व विकास (Leadership Development), मूल्यांकन आणि मूल्यमापन (assessment and evaluation), संसाधन (Resources), आणि नेटवर्किंग – या सात केंद्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांच्या सहयोगाने प्रामुख्याने शिक्षकांच्या क्षमतांची बांधणी करण्यावर भर आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये यापैकी सहा केंद्रांच्या अंतर्गत एकूण २३ शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. ह्या करारांअंतर्गत विविध कार्यक्रमाद्वारे, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल.

२०२० मध्ये सेक्शन-८ कंपनी या स्वरूपात कार्यान्वित झालेल्या MSFDA ने यापूर्वीही असे ११ सामंजस्य करार केलेले आहेत. विद्यार्थांचे भवितव्य आणि त्यांचा सर्वांगीण विकासामाघ्ये महाविद्यालये आणि शिक्षकांचे महत्वाचे योगदान असल्यामुळे, आतापर्यंत उच्च व तंत्र शिक्षणाच्या विविध शाखांमधील २००० हून अधिक शिक्षकांसाठी क्षमता संवर्धनाच्या कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातून शिक्षक, तसेच काही वेळा विद्यार्थी, प्राचार्य, आणि शिक्षकेतर अधिकारी – कर्मचारी सुद्धा सहभागी झाले. यामध्ये महिला सहभागींची संख्या निदान ४०% पर्यंत होती. मानवी जीवनामध्ये कलेचे महत्त्व, नेतृत्व, भारतीय ज्ञान प्रणाली, युवा मानसिक स्वास्थ, समावेशक शिक्षण (उदा., दिव्यांग), उद्योजकता या आणि अशा अनेक विषयांचा यात समावेश होता. आजच्या कार्यक्रमामध्ये यापैकी उपस्थित जवळ जवळ ५० सहभागी शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी सुद्धा मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद साधला. येणाऱ्या काही क्षमता-बांधणी कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या सर्व, विशेषतः ग्रामीण भागातील महाविद्यालयांपर्यंत पोहचून तेथील विद्यार्थी-शिक्षक तसेच तज्ज्ञांना या उपक्रमांमध्ये समाविष्ट करण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. त्याचबरोबर, सहभागींशी नंतरही सातत्याने संपर्क ठेवा, अशी सूचना त्यांनी सर्व प्रशिक्षकांना दिली.