पुणे, 8 सप्टेंबर, 2023: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमीच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात श्रेया पठारे हिने तर, मुलांच्या गटात विश्वजीत सणस यांनी विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित विश्वजीत सणस याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित स्वराज ढमढेरेचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 30 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये विश्वजीतने स्वराजची दुसऱ्याच गेममध्ये सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये विश्वजीतने वर्चस्व राखत स्वराजविरुध्द हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. नवव्या गेममध्ये विश्वजीतने आक्रमक खेळ करत स्वराजची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विश्वजीत ओपन स्कूलमध्ये 10वी इयत्तेत शिकत असून आदित्य कैफी टेनिस अकादमी मध्ये प्रशिक्षक आदित्य मडकेकर व कैफी अफजल यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात एकेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने रिशिता पाटीलचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. हा सामना 1तास 35मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये श्रेयाने दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये रिशिताची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा एकतर्फी जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये रिशिताने जोरदार खेळ करत पहिल्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण श्रेयाने कमबॅक करत चौथ्या गेममध्ये रिशिताची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकून विजय मिळवला. श्रेया एसएस अजमेरा शाळेत नववी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक संदीप किर्तने यांच्या मार्गर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमक्यूअर फार्मासिटीकल लिमिटेडच्या आर अँड डी विभागाचे सहयोगी संचालक जिनेश मालदे, सीएसआर विभागाचे मुख्य गिरीश घनवट, डेक्कन जिमखानाच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहिर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन किर्तने, रिया किर्तने, पीएमडीटीएचे हिमांशु गोसावी, संदीप किर्तने, स्पर्धा सुपरवायझर निहारिका गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी:
विश्वजीत सणस(1)वि.वि.स्वराज ढमढेरे(3) 6-3, 6-4;
मुली: श्रेया पठारे (1)वि.वि.रिशिता पाटील 6-0, 6-2.

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश