एमटीडीसी’चे सिंहगड येथील पर्यटक निवास पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल

पुणे, १९ जून २०२१: सिंहगडावर पर्यटकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) उभारण्यात आलेले पर्यटक निवास अत्याधुनिक सोयी-सुविधांसह पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले आहे. महामंडळातर्फे मंगळवारी (दि.१९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात या पर्यटक निवासाचे लोकार्पण करण्यात आले.


ऐतिहासिक महत्व असलेल्या सिंहगडावर पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी एमटीडीसीने पूर्वी बांधलेल्या पर्यटक निवासाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. सिंहगडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ॲम्पीथिएटरही आहे. सदरच्या ठिकाणी विविध ग्रुपकडुन मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन आगामी काळात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली. पर्यटक निवास आणि उपहारगृहे निर्जंतुकीरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली असून, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.
सिंहगड पर्यटक निवासामध्ये खालीलप्रमाणे सोयीसुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

 1. एकुण उपलब्ध जागा – 32 गुंठे
 2. निवासी खोल्या (ए.सी.) – 2 सुट
 3. व्ही. आय. पी. सुट (ए.सी.) – 1 सुट
 4. लोकनिवास – (महीला) – (8 बेडेड)
 5. लोकनिवास (पुरुष) – (8 बेडेड)
 6. तंबुनिवास – 3 युनिट. (प्रस्तावित)
 7. रेस्टॉरंट – 1 युनिट
 8. डायनिंग – 1 युनिट
 9. स्वागतकक्ष – 1
  एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असुन, रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम जानेवारी २0२१ मध्ये पुर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर अंतर्गत सजावट आणि पर्यटक सोयीसुविधा यांची कामे जुन २०२१ मध्ये पुर्ण करण्यात आली.