September 11, 2025

महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त

पुणे, ११/०९/२०२५ : शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेने एकाचवेळी मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. संपूर्ण शहरात झालेल्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृत पथारी व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

औंध-बाणेर, नगररस्ता-वडगावशेरी, मुंढवा-हडपसर, धानकवडी-सहकारनगर आणि कसबा-विश्रामबागवाडा या पाच परिमंडळांमध्ये कारवाई राबवण्यात आली. यात तब्बल ५००० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. याशिवाय २ स्टॉल, १९ हाटगाड्या, ९० पथारी व ९७ शेड हटवण्यात आली.

उपआयुक्त संदीप भलगट यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या मदतीने ही मोहीम राबवली. फुटपाथ, पदपथ, रस्ते आणि सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे उभारलेले शेड, हाटगाड्या, सिलेंडर विक्री केंद्रे व पथाऱ्या यांना हटवण्यात आले.

महापालिकेने इशारा दिला आहे की, बेकायदेशीर अतिक्रमण आणि रस्त्यावर केलेल्या अडथळ्यांवर आता कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही; नियम मोडणाऱ्यांवर अशाच कठोर कारवाया सुरू राहतील.