संस्कृत आणि प्राकृत भाषेच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी मूर्ती ट्रस्टतर्फे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला साडेसात कोटी रुपयांची देणगी देण्यात येणार असल्याची घोषणा

पुणे, ९ डिसेंबर २०२२- मूर्ती ट्रस्ट या श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री. नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (BORI) संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसन क्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत, व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्रीमती सुधा मूर्ती म्हणाल्या, “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही १०५ वर्षे जुनी संस्था आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. या संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत. ‘महाभारताची चिकित्सा आवृत्ती’ आणि ‘काणे यांचे धर्मशास्त्र’ या दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेत. काळ बदलला तसे आता लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग हवे आहेत. या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधायची इच्छा आहे. म्हणूनच मूर्ती ट्रस्टने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी समर्पित असलेली एक नवीन आणि आधुनिक इमारत बांधून देण्याचे ठरवले आहे.”

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन यांनी देखील संस्थेच्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजच्या योजनांबद्दल सांगितले. “माननीय सुधाताई यांनी शैक्षणिक प्रकल्पांसाठी निधी दिला आहे आणि आता संस्थेकडे भारतीय तत्त्वज्ञान ते कथ्थक आणि आयुर्वेदापासून खगोलशास्त्रापर्यंत विविध विषयांवर काम करणारे अंदाजे ४० विद्वान आहेत. आगामी मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीज ६० हून अधिक विद्वानांना सामावून घेऊ शकते. त्याच वेळी या संशोधन संस्थेने आता शिक्षणकार्यातही प्रवेश केला आहे. त्यामुळे, वर्गखोल्यांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी २०० विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल आणि या मूर्ती सेंटरमध्ये स्टुडिओ असल्याने आम्ही चांगला ऑनलाइन आशय तयार करू शकू आणि तो ‘भारतविद्या’ या आमच्या प्लॅटफॉर्मवर सादर केला जाईल. संस्थेकडे २८,००० हस्तलिखिते आणि जुनी पुस्तके आहेत. ही पुस्तके जतन करण्यासाठी नवीन इमारतीत एक संवर्धन प्रयोगशाळा असणार आहे. संस्थेसाठी आणि तिच्या भविष्यासाठी ही एक मोठी झेप ठरणार आहे. या सुविधेमुळे भारतीय संस्कृतीतील् विविध विषयांचा प्रसार जगभर केला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही मूर्ती ट्रस्टचे अत्यंत ऋणी आहोत.”

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (BORI)
पुण्यात १९१७ मध्ये स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे(BORI) मध्ये संस्कृत आणि प्राकृत सारख्या अनेक भाषांमधील १,२५,००० हून अधिक पुस्तके आणि २८,००० हस्तलिखिते असा दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचा सर्वात मोठ्या संग्रहापैकी एक आहे. संस्थेला महाराष्ट्र शासनाचे अंशत: पाठबळ आहे. विशिष्ट संशोधन प्रकल्पांसाठी भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडूनही अनुदान मिळाले आहे. ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ याचे विविध खंड आणि ‘महाभारताची चिकित्सा आवृत्ती’ यासारख्या जागतिक दर्जाच्या उत्कृष्ट अभ्यासपूर्ण प्रकल्पांची निर्मिती करण्याचे श्रेय संस्थेला जाते.