नगरकर सुपरकिंग्ज, अभिनव रायझिंग स्टार्स, दिलीप सोनिग्रा रॉयल्स, संकेत वॉरियर्स उपांत्य फेरीत

पुणे, 21 नोव्हेंबर 2022 : पुणे सराफ असोसिएशनच्या ९८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेत नगरकर सुपरकिंग्ज, अभिनव रायझिंग स्टार्स, दिलीप सोनिग्रा रॉयल्स, संकेत वॉरियर्स या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पहिला सामना नगरकर सुपरकिंग्ज, अभिनव रायझिंग स्टार्स यांच्यात, तर दुसरा सामना दिलीप सोनिग्रा रॉयल्स, संकेत वॉरियर्स यांच्यात होणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत नगरकर सुपरकिंग्जने सिल्व्हर स्ट्रायकर्सला दोन धावांनी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना सुपरकिंग्जने निर्धारित ८ षटकांत सहा गडी गमावत ६४ धावा केल्या. विजयासाठी ६५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सिल्व्हर स्ट्रायकर्सने चांगली लढत दिली. मात्र, २ धावांनी त्यांचा निसटता पराभव झाला. ५ गडी गमावत ८ षटकांत ६२ धावांची मजल मारता आली.
दिलीप सोनिग्रा रॉयल्सने मुंदडा डायमंड्सवर ३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. रॉयल्सच्या भेदक माऱ्यापुढे डायमंड्सचा संघ अवघ्या ४४ धावांत सर्वबाद झाला. रॉयल्सने विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विजयासाठी ५२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या अभिनव रायझिंग स्टार्सने जोरदार फलंदाजी करत ८ चेंडू व ६ गडी राखून जैनम जायंट्सचा पराभव केला. त्यामुळे साखळी सामन्यात गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या जायंट्सला उपांत्य फेरी गाठता आली नाही.
उपांत्यपूर्व फेरीतील चौथ्या सामन्यात रांका टायटन्सला संकेत वॉरियर्सने पराभवाचा धक्का दिला. वॉरियर्सने दिलेले ३ गडी गमावत ६७ धाव केल्या. ६८ धावांचे लक्ष्य टायटन्सला गाठता आले नाही. ८ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात टायटन्सला ६४ धावा करता आल्या. तीन धावांनी निसटता पराभव झाल्याने गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या टायटन्सला स्पर्धेबाहेर जावे लागले.