मलिक यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे, २४/०२/२०२२: अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्याने त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज अलका टॉकीज चौकात निदर्शने केली. केंद्र सरकार मधील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे आपली भूमिका मांडणाऱ्या नवाब मलिक साहेबांना काल पासून सातत्याने त्रास देण्याची भूमिका ईडी ने घेतली आहे. सकाळी पहाटे पाच वाजता कुठलाही समन्स न बजावता अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकने असो किंवा समन्स न बजावतात केलेली अटक असो अशा विविध माध्यमातून वारंवार नवाब मलिक साहेबांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच मलिक साहेबांना पाठिंबा देण्यासाठी तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या या घाणेरड्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अलका टॉकीज चौक येथे एकवटले.

यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित राहत भाजपच्या या वृत्तीचा निषेध केला. समवेत युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते अजिंक्य पालकर, अभिषेक बोके, राकेश कामठे, विशाल वाकडकर आदींसह मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.