सामाजिक संस्था व पोलीस यांच्यात संवाद हवा: भानुप्रताप बर्गे यांचे मत

पुणे, २५/०७/२०२२: “सामाजिक संस्था म्हणजे बिनकामाच्या लोकांचे उद्योग, फॉरेन फंडींगसाठी उभारलेली व्यवस्था असा प्रशासनाचा बऱ्याचदा समज असतो. मात्र, सामाजिक संस्था या समस्यांचे निराकरण करणारे केंद्र असल्याचे प्रत्यक्ष कामात सहभागी झाल्यास जाणवते. अनेकदा समस्या या संस्थांकडे आधी येतात आणि नंतर पोलिसांना समजतात. त्यामुळे संस्था आणि पोलीस यांच्यात संवाद होत राहिला, तर समस्या लवकर सुटण्यास मदत होईल,” असे मत माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

 

 

वंचित विकास संस्थेच्या वतीने स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त एकदिवसीय सामाजिक परिषदेचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्रित येत विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण केली. वंचित विकास’चे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, कार्यवाह मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत गबाले, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

 

सामाजिक कार्य आणि कायदा यावर ॲड. शिवराज कदम जहागीरदार, ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्रामवर डॉ. नारायण देसाई, सजग नागरिक मंचाविषयी विवेक वेलणकर, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाविषयी अरुणा विचारे, जीवित नदीविषयी शैलेजा देशपांडे, बालरंजन केंद्र मुलांच्या अधिकाराविषयी माधुरी सहस्रबुद्धे, सामाजिक संस्था आणि फंडिंग एजन्सी यांच्यातील संवाद यावर मंजुषा दोषी, संस्कार संजीवनी फाउंडेशनविषयी परमेश्वर काळे, परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेविषयी धनराज बिराजदार, इन्स्टिट्यूट ऑफ स्टडी ऍब्रॉड विषयी उत्तरा जाधव आणि शासन व सामाजिक संस्था यावर वैशाली नवले या सामाजिक परिषदेत आपले विचार मांडले.

 

भानुप्रताप बर्गे म्हणाले, “तळागाळातील लोकांपासून ते पंचतारांकित बंगल्यातील लोकांपर्यंत सर्वांशीच आमचा संबंध येतो. त्यांच्या समस्या खूप जवळून पाहतो. आपल्यातील ‘माणूस’ जिवंत ठेवून त्याकडे पाहण्याचे आव्हान असते. कायद्याविषयी, समाजाच्या स्वास्थ्याविषयी जागृती आवश्यक आहे.”

 

ॲड. शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, “संस्थांच्या कार्यावर देखरेखीसाठी धर्मादाय आयुक्तालय आहे. कायद्याचे पालन, कागदपत्रांची पूर्तता व विश्वस्त भावनेतून काम करावे लागते. संस्था कोणाच्या मालकीचे नसल्याने कामकाजाच्या सर्व नोंदी, व्यवहारातील पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न करावा.”

 

डॉ. नारायण देसाई म्हणाले, ” गुरू-संत परंपरेप्रमाणे सामाजिक संस्थांची परंपरा व्हावी. भावी पिढीत सामाजिक दायित्वाची भावना रुजवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. मूल्यांचे, संस्कारांचे, तत्वाचे शिक्षण मुलांना दिले आणि समाजाभिमुख कामाची गोडी त्यांना लावली, तर समाजाचे आरोग्य अधिक चांगले होईल.”

 

विवेक वेलणकर म्हणाले, “माहितीच्या अधिकाराचा उपयोग, फायदे समजून घ्यायला हवेत. सरकारी संस्था लोकांवर उपकार केल्याच्या आविर्भावात असतात. या अधिकाराने त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिली आहे. सामान्य माणसाला व्यक्त होण्याचा आत्मविश्वास दिला आहे. माहिती अधिकाराचा चांगला उपयोग आपण केला पाहिजे.”

 

शैलजा देशपांडे म्हणाल्या, “पर्यावरणाच्या वतीने त्यांचे कान, नाक, डोळे, हात आम्हाला व्हावे लागते. त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे ते कसे फुलावयचे याचा प्रयत्न आमचा आहे. आपण नदीवर फक्त आघात करतो मात्र नदीसाठी तिथपर्यंत पोहचत नाही. पर्यावरणाच्या विषयी आपुलकी निर्माण होणे आवश्यक आहे.”

 

माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, “संस्कार म्हणजे भविष्यासाठी दिलेली शिदोरी असते. प्रत्येक मुलाला सजग पालक मिळण्याचा त्याचा हक्क आहे. मुलांना आनंदी बालपण मिळावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचे बालपण बघितले तर ते आनंदी नसते. मुलांमध्ये न्यूनगंड नसावा. पालक, शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे.”

 

मंजुषा दोषी म्हणाल्या, “हेतू आणि अपेक्षा याचा मेळ साधला तरच फंडिंग जमून येते. त्यासाठी संस्थेच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण असाव्या, काम कोणासाठी, किती क्षेत्रात, कुठे होणार आदी माहिती पूर्ण असावी. प्रत्यक्ष कोणत्या प्रकल्पासाठी मदत हवी आहे, त्याचा प्रस्ताव थोडक्यात, मोजक्या, प्रभावी शब्दात असावे.”

 

परमेश्वर काळे म्हणाले, “वंचित, अनाथ, भटक्या मुलांसाठी निवासी आश्रम चालवताना मोठी कसरत होते. या मुलांना माणूस म्हणून जन्म मिळतो; पण माणूस म्हणून कोणतेही हक्क मिळत नाही. त्यांना शिक्षणाचे, चांगला माणूस जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे.”

 

उत्तरा जाधव म्हणाल्या, “अमेरिकन विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांना भारत समजून घेण्यासाठी आम्ही मदत करतो. जितकी माणसे तितके अनुभव हे भारतातच शिकायला मिळते. आपल्या देशाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अनुभव आम्ही त्यांना देतो.”

 

वैशाली नवले म्हणाल्या, “शासन मूठभर आहे आणि सामाजिक प्रश्न खूप आहेत. त्यामुळे शासन आणि सामाजिक संस्थांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. असे झाले तर समाजासाठी नक्कीच चांगले काम घडू शकते. उद्देशप्राप्ती साठी योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे.”

 

अरुणा विचारे कुटुंब नियोजन, अधिकृत गर्भपात, माता व शिशुंचे पोषण, स्त्री-पुरुष नसबंदी, तरुणांना लैंगिक शिक्षण व निरोधांचा वापर याविषयी जनजागृती, तृतीय पंथीयांना अन्नपुरवठा आदी विषयी माहिती दिली. धनराज बिराजदार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार मांडले.

 

ॲड. तानाजी गायकवाड यांनी स्वागत केले. मीनाताई कुर्लेकर प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत गबाले यांनी सूत्रसंचालन केले. मीनाक्षी नवले यांनी आभार मानले.