प्राध्यापक भरतीसाठी उदय सामंत याची आता नवी घोषणा 

पुणे, ५/०६/२०२१: करोनामुळे राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक भरतीस विलंब होत आहे. मात्र करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्राध्यापक सेवेत रूजू होतील, अशी ग्वाही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे आता प्राध्यापक भरती किमान एक वर्ष तरी लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

करोनाचे संकट कमी होत असून, महाविद्यालये कधी सुरू होतील, या प्रश्‍नांवर उदय सामंत यांनी करोनाची स्थिती पूर्ण नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नसल्याचे सामंत यांनी सांगितले. खासगी विद्यापीठांकडून अवाजवी शुल्कवाढ होता कामा नये, या मताचा मी देखील आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर खासगी विद्यापीठांसाठी शुल्क नियंत्रण समिती नेमण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात सीओईपीची शैक्षणिक गुणवत्ता पाहता ही संस्था उच्च दर्जाची आहे. त्यामुळे सीओईपीला स्टेट इन्सिटट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचा दर्जा देण्याचा विचार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सामंत यांनी आज दिले.

शैक्षणिक शुल्कवाढीवर राज्य शासन गंभीर

सध्या करोनाच्या संकटात शैक्षणिक शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. त्याचा निर्णय शुल्क नियामक समिती घेत असते. सध्या या समितीची मुदत संपली आहे. समिती नेमण्याचा प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने बैठक घेऊन शुल्क कमी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र शुल्क वाढीच्या तक्रारी येणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.