पिंपरी, २४ नोव्हेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील टाकाऊ वस्तूंना नवे जीवन देत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ या संकल्पनेवर आधारित या मोहिमेमुळे कचरा-संवेदनशील ठिकाणांचे रूपांतर आकर्षक आणि कलात्मक जागांमध्ये होत असून शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मितीचा नवा आदर्श निर्माण होत आहे.
शहरातील ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग १७ (बिजलीनगर), प्रभाग २२ (शांती चौक, काळेवाडी) तसेच इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग ०५ (सखुबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी) येथील ठिकाणे टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या देखण्या कलाकृतींनी सजली आहेत. या जागा पूर्वी कचरा टाकण्यामुळे अस्वच्छ होत असत; मात्र महापालिकेच्या उपक्रमामुळे येथे आकर्षक दृश्यरचना उभी राहिली आहे.
सफाई सेवकांनी जुन्या टायर, प्लास्टिक डबे, बाटल्या, लोखंडी फ्रेम्स, पाइप्स आदी टाकाऊ साहित्याचा कल्पक वापर करून उद्याने, रस्त्याकडील मोकळ्या जागा आणि सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण केले. स्वच्छता आणि कलात्मकता यांचा संगम साधत त्यांनी कचरा व्यवस्थापनाला सर्जनशीलतेची जोड दिली आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य विभाग प्रमुख व उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तसेच आरोग्य कार्यकारी अधिकारी व सहायक आयुक्त अमित पंडित यांनी केले. सहायक आरोग्य अधिकारी राजेश भाट, सुधीर वाघमारे, श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, भूषण शिंदे, आरोग्य निरीक्षक रूपाली साळवे, मुकेश जगताप आणि विकास शिरवाळे यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
शहरातील नागरिक या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून ‘स्वच्छतेतून सौंदर्य’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून उमटताना दिसत आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “पिंपरी चिंचवड महापालिकेची ही कलात्मक मोहीम इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून पुढील काळात अशाच अनेक सुशोभीकरण प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. टाकाऊ वस्तूंच्या कल्पक वापरातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छता आणि सौंदर्याचा नवा आदर्श निर्माण करत आहे.”

More Stories
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत वाढवली
पिंपरी चिंचवड: आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!
वाकड–पुनावळे अंतर्गत व डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा: आमदार शंकर जगताप