महापालिकेचे नवे आदेश ; स्पर्धा परीक्षा केंद्र, क्रीडांगणे खुले

पुणे,  ०२/०७/२०२१: महापालिकेने स्पर्धा परीक्षा केंद्र ५० टक्के क्षमतेने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आठवड्याचे सर्व दिवस आउट डोअर व इनडोअर गेम खेळता येणार आहेत. यासाठी लसीकरण अनिवार्य असणार आहे.

शहरात तिसऱ्या स्तराचे नियम लागू झाल्याने कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. आॅनलाइन वर्ग गुरू होते. मात्र, महापालिकेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व क्लासेस सोमवार ते शुक्रवार या दिवसात सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी येणारे विद्यार्थी, शिक्षक यांनी किमान कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्‍यक आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सर्व आउटडोअर व इनडोअर खेळ आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार पर्यंत खेळता येणार आहेत. या ठिकाणी सर्व खेळाडू व कर्मचारी यांचे दोन्ही लसीचे डोस झालेले असणे अनिवार्य आहे. हे नियम पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोमेंटला देखील लागू असणार आहेत,   याबाबत शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आदेश काढले आहेत.