पुणे: वडगाव पूल ते नवले पूल जोडणार, एनएचआयचा प्रस्ताव ; महापालिका काढणार अतिक्रमणे

पुणे, १८/०१/२०२२: नवले पूलाच्या परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) कडून नवले पूल ते वडगाव पूल नवीन पूलाने जोडण्यात येणार आहे. या शिवाय, महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्याचे काम तातडीनं पूर्ण करून महामार्गाला असलेली पंक्‍चर बंद केली जाणार असल्याची माहिती एनएचआयच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेस देण्यात आली. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी तसेच एनएचआयकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी बैठक बोलविली होती. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभाग व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह एनएचआयचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत एनएचआयकडून अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दिर्घकालीन उपाय योजना तसेच तातडीच्या उपाय योजनांची माहिती दिली तर महापालिकेकडूनही यावेळी या अपघात प्रवण क्षेत्रात कोणत्या सुधारणा करण्यात याव्यात याचे सादरीकरण करत एनएचआयच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
———
एनएचआयच्या उपाय योजना व सूचना
– वडगाव पूल ते नवले पूल नवीन पूलाने जोडणार
– रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्ता लक्षात येण्यासाठी थ्रीडी थर्मोप्लासट मारणार
– साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर नवले पूल ते दरी पूलापर्यंत नो पार्किंग करणार
– ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी पथदिवे तातडीनं उभारणार
– रस्त्यावर प्रत्येक 500 मीटरवर रंबलर टाकणार
– माहिती फलक मोठया आकारात आणि ठळक दिसतील असे लावणार
– नर्ऱ्हे- आंबेगाव स्मशानभूमीची जागा मिळाल्यास अर्धवट सेवा रस्ता पूर्ण करणार
– सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीनं काढावीत
———————————
महापालिकेने केलेल्या सूचना
– वडगाव पूलावरून कालव्याच्या बाजूला मुंबईकडे जाण्यासाठी व पुण्याकडे येण्यासाठी दोन छोटे सेवा रस्ता पूल उभारावेत.
– महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूला पर्यंत दोन ठिकाणी कायमस्वरूपी स्पीड गन असाव्यात
– सूचना फलक रस्त्याच्या डाव्या बाजूला न लावता, मधोमध लावावेत
– रात्रीसाठी फ्लिकरींग दिवे बसविण्यात यावेत.
-सेवा रस्त्यांची कामे तातडीनं पूर्ण करावीत
– अनावश्‍यक पंक्‍चर बंद करावेत