शहरात कोकेन, ड्रग्ज विक्रीप्रकरणी नायजेरियन व्यक्तीसह एकास अटक

पुणे, २३ जानेवारी, २०२२: पहाटेच्या वेळी कोकेन आणि ड्रग्ज विक्री करणार्‍या नायजेरियन व्यक्तीसह आणखी एका व्यक्तीला पोलीसांनी मध्यरात्री गस्त घालताना पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे हे रात्रीच्या वेळेस गस्त करताना कॅम्प येथे आले होते. त्यांना तिथे फुटपाथवर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींवर संशय आला. या व्यक्तींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी इतर स्टाफचा मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पकडल्यानंतर नाव व पत्ता विचारला असता, एकाचे नाव चिकवु जेकवु रेऊबेन ( वय ३६, रा. मुळ- मकुरडी, नायजेरिया, सध्या रा. नालासोपारा, जि. ठाणे) व दुसरा मोहम्मद मुसावी महमूद मुसवी, ( वय ३८, रा. ९५१, न्यू नाना पेठ, पदमजी पार्क, पुणे) हा पत्ता सांगितला. पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडून 20 ग्रॅम कोकेन, दोन व चार चाकी वाहने, पासपोर्ट व दोन मोबाईल असे एकूण १५.२९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांवर लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ७/२०२२ एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २२( ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकवु जेकवु रेऊबेन हा ठाण्यावरुन पुणे येथे खास विक्रीसाठी आला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास लष्कर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड करत आहेत.
ही कामगिरी पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , परिमंडळ -१ च्या पोलीस उपआयुक्त प्रियांका नारनवरे, परिमंडळ २चे पोलीस उपआयुक्‍त सागर पाटील, लष्कर विभागाचे पोलीस आयुकत यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक, पोलिस हवालदार मनसुब शेख, हिंदुराव शिंदे, कैलास चव्हाण, पोलिस नाईक तेजस जगदाळे, विजया वेदपाठक, मनिषा तळेकर पोलिस शिपाई सलमान शेख, सागर हुवाळे, नानासाहेब घाडगे, आबासाहेब धावडे, पवन भोसले, चक्रधर शिरगीरे, संभाजी दराडे यांनी केली.