September 24, 2025

अपंगत्वासह जगणाऱ्यांसाठी मेट्रो स्टेशन वर लिफ्ट नाही, लॉ च्या विद्यार्थ्यांची पुणे मेट्रोला कायदेशीर नोटीस

पुणे, १३/०१/२०२४: लॉच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असलेल्या रिशान सरोदे व वेदांग आवले या दोन तरुणांनी डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि छत्रपति संभाजी महाराज उद्यान दोन स्टेशनवर अपंगत्वासह जगणाऱ्या व्यक्तींना मेट्रोचा प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना केलेली नाही असा आरोप करून पुण्यातील सर्व मेट्रो स्टेशन्स अपंगत्वासह जगणाऱ्यांसाठी मैत्रीपूर्ण वापर करण्यायोग्य ( disabled friendly) असावेत अशी मागणी केली आहे.

शंकरराव चव्हाण मराठवाडा लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रिशान व वेदांग या दोन विद्यार्थ्यांनी ॲड श्रीया आवले यांच्या मार्फत पुणे मेट्रोला कायदेशिर नोटिस बजावली आहे. डेक्कन मेट्रो स्टेशन व छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्टेशनवर अपंगत्वासह जगणाऱ्यांसाठी लिफ्ट का लावली नाही असा प्रश्न त्यांनी कायदेशीर नोटिसमधून उपस्थित केला आहे.

या दोन्ही तरुणांनी पुणे मेट्रोचा प्रवास केलेला आहे. त्यांना प्रवास करतांना असे लक्षात आले की, डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन व छत्रपति संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन या दोन्ही ठिकाणी अपंग व्यक्तीसाठी किंवा व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी प्रवेश नाही अशा प्रकारे प्रवेश नाकरणे हे संविधानाने दिलेल्या मुलभूत तसेच मानवी हक्कांचे सुद्धा उल्लंघन आहे. पुणे मेट्रोनी केलेल्या या कृत्यामुळे पुणे शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या हक्काचे स्पष्ट उल्लंघन होत आहे, त्यांना विशिष्ट मेट्रो स्टेशनवरून मेट्रो ट्रेन वापरण्याचा अधिकारच नाही असे चित्र निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून आवश्यक असलेल्या बदलांबाबत सूचना मिळाल्या असूनही सुधारणा करण्याबाबत पुणे मेट्रो कंपनीद्वारे संथगतीने पाऊले उचलली जात आहेत.

आपल्या शहराला विकासपुर्ण करायचे असेल किंवा स्मार्ट सिटी बनवायचे असेल तर शहराच्या नियोजन प्रक्रियेत सर्वांना समान महत्व व प्राधान्य दयावे लागेल तरच शहराचा विकास होईल.अपंगत्वासह जगणाऱ्यांसाठी पुणे शहरात अनेक पायाभूत सुविधांची गरज आहे व त्याबाबत आम्ही लवकरच अभ्यास करून एक अहवाल तयार करणार असल्याचे रिशान सरोदे म्हणाला.

पुणे मेट्रोने दिव्यांगांना योग्य सोयी देण्यात अपयशी ठरल्यास व कायदेशिर नोटिसला उत्तर न दिल्यास अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांकरिता न्याय मागण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असे ॲड श्रीया आवले म्हणाल्या.