लक्ष्मी रस्त्यावर शनिवारी ‘वॉकींग प्लाझा’ साठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे, १०/११/२०२१: महापालिकेच्यावतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर शनिवारी ‘वॉकींग प्लाझा’ करण्यात येणार आहे. त्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर येणारी वाहतुक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

नागरीकांना वाहतुक कोंडीतुन मुक्त होऊन खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेडून लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकादरम्यान शनिवारी (ता.११) ‘वॉकींग प्लाझा’ करण्यात येणार आहे. महापालिकेकडून ‘वॉकींग प्लाझा’चे नियोजन करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकादरम्यानच्या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

‘‘पादचाऱ्यांसाठी चांगले व सुरक्षीत पादचारी मार्ग, चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नल यासह इतर सुविधा कायम मिळायला हव्या यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहे. यानिमित्तानेच पादचारी दिनाचे आयोजन केले आहे.”, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

बंद असणारे रस्ते व पर्यायी मार्ग
– लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक (सेवादसन चौक) ते उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी बाजीराव रस्त्याने पुढे सरळ अप्पा बळवंत चौकातुन केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे तसेच अप्पा बळवंत चौकातुन सरळपुढे गाडगीळ पुतळा (शनिवारवाडा) मार्गे इच्छितस्थळी जावे
– केळकर रोडवरील मंदार लॉजकडून लोखंडे तालीम चौक मार्गे, पुढे लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाकडे जाणारी वाहने हि केळकर रस्त्यावरुन पुढे रमणबाग चौक (टकले हवेली चौक), मार्गे उंबऱ्या गणपती चौकाकडून इच्छितस्थळी जावे
– लक्ष्मीरोड बेलबाग चौकाकडून सेवासदन चौकाकडे येणारी वाहने बाजीराव रस्त्याने पुढे अप्पा बळवंत चौकातुन पुढे जातील.
– बाजीराव रोड पुरम चौकातुन शनिपार चौक मार्गे लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौकाकडे जाणारी वाहने सरळ बाजीराव रस्त्याने अप्पा बळवंत चौकमार्गे पुढे जातील.
– आवश्‍यकतेनुसार पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातुन टिळक रस्ता, टिळक चौक मार्गे, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जावे
– आवश्‍यकतेनुसार, स.गो.बर्वे चौकाकडून शिवाजी रोडकडे येणारी वाहने हि जंगली महाराज रस्त्याने पुढे जावे
– लक्ष्मी रोडवरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंत असलेली दुचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे.