नोबेल पारितोषिक विजेते रीचर्ट रॉबर्ट यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट

पुणे, दि.०२/११/२०२२- शालेय जीवनात मला कोडी सोडवायला फार आवडायचे, त्यातूनच पुढे गणित विषयाची आवड निर्माण झाली. माझ्या नोबेल पर्यंतच्या वाटचालीत मला अनेक चांगले प्राध्यापक मिळाले ज्यांच्यामुळे मला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि नवे प्रयोग करता आले, असे सांगत १९९३ साली मेडीसिन मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या रिचर्ड रॉबर्ट यांनी आपला प्रवास उलगडला.

रिचर्ड रॉबर्ट यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांचीही भेट घेत विद्यापीठाविषयी जाणून घेतले. विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ शेखर मांडे, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कुंभार, इनोवेशन सेलचे संचालक डॉ.संजय ढोले यांच्यासह अनेक प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिचर्ड रॉबर्ट यांनी विद्यापीठातील राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात ‘ नोबेल पारितोषिकापर्यंतची वाटचाल ‘ या विषयावर व्याख्यान दिले. या त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर त्यांनी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांशी देखील मुक्त संवाद साधला.

विज्ञान केंद्रात बोलताना रिचर्ड रॉबर्ट यांनी त्यांच्या जनुकांविषयी केलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही अयशस्वी होता तेव्हा निसर्ग तुम्हाला काही वेगळं सांगू इच्छित असतो. या अपयशातूनच मीही शिकलो. विकसनशील देशांसाठी अनुवंशिकरित्या सुधारित पीक (GMO) घेणे चांगली बाब आहे. प्रत्येक जीव आणि पिकामध्ये अनुवंशिकरित्या बदल हा होतच असतो. विकसनशील देशात असे पीक घेणे ही स्वागतार्ह बाब आहे, त्यामुळे देश पुढे जाण्यास मदत होईल.