नोबेल पारतोषिक विजेते सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट

पुणे, 31 ऑक्टोबर 2022:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स यांच्या भेटीचे आयोजन दिनांक २ व ३ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स नोबेल लॉरेट हे १९९३ सालातील मेडिसिनचे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. सेंद्रिय रसायनशाास्त्रज्ञ म्हणून संशोधन कार्य केल्यानंतर त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा जीवशास्त्रीय संशोधन कार्यासाठी समर्पीत केली. कदाचित हाच त्यांचा प्रवास सार्थ ठरला आणि त्यांची संशोधनाची वाटचाल ही वेगळ्या उंचीवर पोहोचली. आपल्या भारतातील भेटीमध्ये ते आपल्या संशोधनाचा प्रवास आणि त्याचे विविध पैलू उलगडणार आहेत. त्यांच्या या भेटी दरम्यान ते सिरम इन्स्टिट्युट, पर्सिस्टंट अशा विविध औद्योगिक संस्थाना भेटी देणार आहेत. तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र येथील संशोधकांना ते माार्गदर्शन करतील. मॉडर्न व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११. ४५ वाजता राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर येथे ” The Path to Nobel Prize ” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात करण्यात आले आहे अशी माहिती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कुंभार यांनी दिली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचीही ते भेट घेणार आहेत.

सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स ह्यांचे संशोधन वैशिष्ट्यपुर्ण आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार असून सर्वांसाठी त्यांच्या व्याख्यानाचे प्रसारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईट https://webcast.unipune.ac.in वर दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १.२५ या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी घ्यावा असे आवाहन रसायनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.