स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील १२९ गावे ‘हागणदारी मुक्त प्लस’ घोषित करण्यात येणार

पुणे, 29/7/2022: जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत ‘हागणदारी मुक्त अधिक’ (ओडीएफ प्लस) निकषांची पूर्तता केलेली १२९ गावे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिनी ‘हागणदारी मुक्त अधिक’ घोषित करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मोहीम स्वरूपात करुन कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत कौंटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे मनरेगा अंतर्गत बांधण्यात आले आहेत. बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मावळ, मुळशी व पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी १०, जुन्नर १२, खेड १४, शिरूर १५, वेल्हा ८ अशी १३ तालुक्यातील एकूण १२९ गावे ‘ओडीएफ प्लस’घोषित करण्यात येणार आहेत.

२०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील ३१५ गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आली असून उर्वरित गावे मार्च २०२३ पर्यंत ‘ओडीएफ प्लस’घोषित करण्यात येणार आहे. याकरीता गाव पातळीवर वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील सर्व संस्थात्मक ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणे. शाळा, अंगणवाडी येथे शौचालयाची उभारणी करून त्याचा वापर करणे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत शोषखड्डा व इतर कामे पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त अधिक करण्याचे नियोजन करण्यात करण्यात आले आहे.

हागणदारीमुक्त अधिकच्या निकषांची पूर्तता संबंधित गावांनी करून घ्यावे व ग्रामसभेत या विषयावर चर्चा करून ठराव करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
0000