September 11, 2025

“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल

पुणे, ११ सप्टेंबर २०२५ ः यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्याने देशातील राजकीय वातावरण तापवले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, “भारत सरकारची भूमिका नेमकी काय आहे? एकीकडे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ‘खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ असं सांगायचं आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचं? जगदाळे कुटुंबावर आलेल्या दुःखाचा आपण साक्षीदार आहोत, अजूनही ते दुःखातून बाहेर आलेले नाहीत. मग अशा वेळी सरकारची भूमिका बदलली का? याचे उत्तर मला केंद्र सरकारकडून हवे आहे.”

मतदारसंघातील विकासकामांचा आढावा
सुळे यांनी यावेळी पुणे जिल्हा परिषद व महापालिका अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेतला. “जलजीवन मिशनची कामं अद्याप अपूर्ण आहेत. पाणीपुरवठा, शाळा, कचरा व्यवस्थापन या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली,” असे त्या म्हणाल्या.

नेपाळमधील अडचणीत असलेल्या भारतीयांविषयी
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत काही भारतीय अडकले आहेत. याबाबत सुळे म्हणाल्या, “आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. लवकरच सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.”

मराठा आरक्षणाचा प्रश्न
मराठा आरक्षणाबाबतचा जीआर न्यायालयात आव्हानित झाल्याबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, “सरकारने लोकांसमोर स्पष्ट उत्तर द्यायला हवं. जाहिराती करणे एक वेगळी गोष्ट आहे, पण त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. सरकारमधील लोकांच्या वक्तव्यामुळे कटुता वाढतेय. न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट कोर्टात न्यायालयात न्यावी लागते, ही दुर्दैवी बाब आहे.”

महापालिका निवडणुकांबाबत संकेत
आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेबाबत त्या म्हणाल्या, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी अनेकदा स्वतंत्र लढलो आहोत. ठाकरे गटासोबत आमची कोणतीही अडचण नाही. राज्यहित, विचारधारा आणि समविचारी लोकांच्या सोबत राहण्यास आम्ही तयार आहोत. अंतिम निर्णय चर्चा करूनच घेतला जाईल.”