पुणे: फी अभावी ऑनलाइन शिक्षण बंद;शाळांच्या मनमानीविरुद्ध तीव्र आंदोलन

पुणे, २३ जून २०२१ : करोना परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा ना भरविता, ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र केवळ फी भरली नाही म्हणून काही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. अशा शाळांविरोधात कांग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, शाळांनी पालकांना फीसाठी मुदत वाढ द्यावी अन्यथा आक्रमक आंदोलन उभारू,असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी दिला.

बागुल म्हणाले, ” शिक्षणाच्या माहेरघरी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे ही संतापजनक बाब असून, केवळ फी भरली नाही म्हणून

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्‍या शाळांची मनमानी कदापि खपवून घेतली जाणार नाही. यासंदर्भात राज्य शासनाकडे आम्ही निवेदन सादर करीत असून, ज्या पालकांना आता फी भरणे

शक्य नाही त्यांना शाळांनी काही महिने मुदत द्यावी अन्यथा या शाळांविरुद्ध आक्रमक आंदोलन उभारले जाईल.”

शाळा ही विद्यार्थ्याला घडवत असते. विद्यार्थ्याला आपल्या शाळेबद्दल खूप अभिमान वाटत असतो. मात्र, आपलीच शाळा फी भरली नाही म्हणून आपल्याला ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या मनात भावनिक व मानसिक कोंडमारा किती होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.पुरेसा निधी गोळा होत नसेल व शिक्षक व स्टाफ यांचा पगार देता येत नसेल अशा शाळांनी शिक्षण प्रशासनाकडे मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.