मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी

पुणे, ८ जून २०२१: कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उभारणी करण्याकरिता जिल्हयामध्ये सन 2021 साठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी कळविले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या 15 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी दवाखाने तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थेमार्फत 1 हजार उमेदवारांना ऑन जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे नि:शुल्क असून प्रशिक्षण पश्चात प्रमाणीकरणासह रोजगार देखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो.

प्रशिक्षणास सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी https://forms.gle/SdLLxFSSx45yB63G9 या लिंकवर उपलब्ध असणा-या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन सौ. अनुपमा उ.पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, पुणे यांनी केले आहे.