विरोध पुरुषांना नव्हे तर पुरुषप्रधानतेला, महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम

पुणे, १६/०३/२०२२: पुरुषांना नव्हे तर पुरुषप्रधान व्यवस्थेला विरोध आहे. पितृसत्तेच्या जागी मातृसत्ता आणणे हा आपला उद्देश नसून समानता आणायची आहे, असा सूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर शाखेने आयोजिलेल्या लिंगसमभाव कार्यशाळेत उमटला.

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर शाखेने कार्यकर्त्यांसाठी सहभागी आणि संवादी पद्धतीने कार्यशाळा आयोजित केली होती. महिला सर्वांगिण उत्कर्ष मंडळाच्या (मासुम) तालुका सहसंयोजक जयश्री नलगे आणि कार्यकर्ते योगेश धेंडे यांनी ही कार्यशाळा घेतली. यावेळी राज्य पदाधिकारी विशाल विमल, अतुल सवाखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बारी, शाखा अध्यक्ष वनिता फाळके, कार्याध्यक्ष विनोद खरटमोल, सचिव श्याम येणगे, सहसचिव अरिहंत अनामिका, आकुर्डी शाखा सचिव स्वप्नील वाळुंज आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

कुटुंबात मुलाला – पुरुष, मुलीला – स्त्री म्हणून घडविण्याची आणि त्यांच्यामध्ये पुरुषप्रधानता निर्माण करण्याची सुरवात होते. त्यामुळे कुटुंबातूनच मुलामुलींना समानतेची वागून दिली पाहिजे, असे जयश्री नलगे यांनी सांगितले. कुटुंबसंस्था, धर्मसंस्था, शासन, प्रसारमाध्यमे, बाजार पेठा या पितृसत्तेचे आधारस्तंभ आहे. या ठिकाणावरून जे लादले जाते ते नाकारण्याची तयारी ठेवल्यास समानतेच्या दिशेने प्रवास सुरु होईल, असे योगेश धेंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन माधुरी गायकवाड यांनी केले. मान्यवरांचे स्वागत नम्रता ओव्हाळ, आकाश छाया यांनी केले. मयूर पटारे, प्रज्ञा सवाखंडे, पल्लवी सवाखंडे, गार्गी बिरदवडे यांनी गाणी सादर केली. पाहुण्यांचा परिचय परिक्रमा खोत यांनी करून दिला. अरिहंत अनामिका यांनी आभार मानले.