September 20, 2025

पुणे शहरातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबई दि. २८/०५/२०२५: पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे आदेश देण्यात आले. बैठकीला आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा.