पुणे, दि. ९ फेब्रुवारी, २०२४ : अष्टांगयोग, योगाभ्यास, योगासने आदी विषयांशी संबंधित विविध विषयांवर उहापोहा करण्यासोबतच योग या विषयामध्ये देशात झालेले कार्य, सध्याची परिस्थिती आणि भविष्यात करता येण्यासारख्या बाबींवर एकाच सर्वसमावेश व्यासपीठावर सांगोपांग चर्चा होत योगाचे विविध पैलू समोर यावेत या उद्देशाने पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि १६ व शनिवार दि १७ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले यांनी दिली.
‘मॅट टू माईंड’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून यासाठी योग व आयुर्वेदा प्रबोधिनी आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्रीय मंडळाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे हे विशेष. दोन्ही दिवशी सकाळी ७.३० ते सायं ५.३० दरम्यान गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या परिसरातील सकल ललित कलाघर येथे ही परिषद संपन्न होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना रोहन दामले म्हणाले, “योगासने ही आपल्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यातही शारीरिक शिक्षण आणि खेळांमध्ये त्यांना कायमच महत्त्वाच्या स्थानी मानले गेले आहे. हेच लक्षात घेत योगासनांशी संबंधित शिक्षक व या विषयातील तज्ज्ञ यांच्यातील संवाद आणखी वाढावा, नव्या पद्धती, शैली आणि जागतिक पातळीवर या क्षेत्रात काय सुरु आहे याची माहिती एकाच व्यासपीठावर सर्वांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रीय मंडळाचे शतक महोत्सवी वर्षे साजरे करीत असताना आम्ही या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.”
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दि १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होईल. यावेळी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान (एस-व्यासा) विद्यापिठाचे योग गुरु डॉ. एच आर नागेंद्र आणि इन्स्टिट्यूट ऑफ सॅलुटोजेनेसिस अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन (आयएससीएम)चे संचालक व पाँडिचेरी येथील श्री बालाजी विद्यापीठातील योग थेरपीचे प्राध्यापक डॉ. आनंदा बालयोगी हे बीज भाषणाद्वारे उपस्थितांना संबोधित करतील.
परिषदेचा समारोप मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संस्थापक आणि माजी संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय कैवल्यधामचे डॉ रणजीत भोगल, द लोणावळा योग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मन्मथ घरोटे, अय्यंगार इन्स्टिट्यूटच्या योगाचार्य अभिजाता अय्यंगार, व्हिएतनाम व थायलंड येथील क्रीयोगाचे मास्तर कमल, पुण्यातील परम योगाच्या संस्थापिका डॉ रेणू महतानी, नॉर्वेच्या विकिंग फूटबॉल क्लबचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ऐरिक हेनिंगसेन, नाशिकच्या योगा विद्याधामचे डॉ गंधार मंडलिक, पुण्यातील कोहम योग शाळेच्या सुचेता कडेठणकर, विश्वानंद केंद्राचे योगाचार्य डॉ. मंडलेचा. शाश्वत योग व आयुर्वेदा संस्थेचे डॉ. विश्वजीत चव्हाण, वेद योग शिक्षण आणि संशोधन फाउंडेशनचे डॉ. रुपेश थोपटे आणि महाराष्ट्रीय मंडळाच्या योग आणि आयुर्वेदा प्रबोधिनीच्या डॉ पल्लवी कव्हाणे आदी तज्ज्ञांचा सहभाग महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य असेल.
व्याख्याने, कार्यशाळा, माहितीपूर्ण प्रदर्शनी आणि महत्त्वाच्या विषयांवरील पेपर्सचे सादरीकरण, प्रात्याक्षिके यांसोबतच संकल्पनांशी संबंधित अनेकविध विषयांची माहिती या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थितांना मिळणार आहे. सध्या जागतिक पातळीवर योग या विषयावर सुरु असलेली चर्चा, घडामोडी यांसोबतच कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके यांची माहिती देणारे प्रदर्शन हे या परिषदेचे एक विशेष आकर्षण असणार आहे.
परिषदेत सादर होणारे पेपर्स हे सखोल संशोधनावर आधारित असल्याने यूजीसी केअर लिस्टेड जर्नल्समध्ये त्यांचा समावेश होण्याची शक्यता असून यामुळे या परिषदेला एक वेगळा आयाम प्राप्त होईल. या परिषदेत घेण्यात येणाऱ्या अनेक कार्यशाळा या विनामूल्य आणि सर्वांसाठी खुल्या असून यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया
ameetprabhu@agashecollege.org किंवा ujwalaraje@agashecollege.org या संकेतस्थळाला भेट देत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रीय मंडळाविषयी – शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षणाचे महत्व महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखले होते. शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव शालेय शिक्षणात व्हावा, व त्यासाठी कुशल असे शिक्षक तयार व्हावेत यासाठी कै. दामले यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना १९७७ साली यश मिळाले व बीपीएड सारखे अभ्यासक्रम सुरु झाले. सध्या टिळक रस्ता व मुकुंद नगर या ठिकाणी महाराष्ट्रीय मंडळातर्फे एकूण ६ शाळा व दोन महाविद्यालये चालवली जातात. यामध्ये टिळक रस्त्यावर इंदिराबाई करंदीकर ही इंग्रजी माध्यमाची शाळा तर मुकुंद नगर मधील शैक्षणिक संकुलात कै. कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला, कै. सौ कमलाबाई शिवरामपंत दामले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, शेठ दगडूराम कटारिया इंग्रजी माध्यमाची शाळा, महाराष्ट्रीय मंडळाची इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (बीपीएड, एमपीएड, पीएचडी) व महाराष्ट्रीय मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय यांचा समावेश आहे. उत्तम दर्जाच्या शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातील उत्तम सुविधा देखील आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी महाराष्ट्रीय मंडळाचा नावलौकिक आहे. संस्थेच्या वतीने विविध खेळांची १४ ते १५ प्रशिक्षण केंद्रेदेखील चालविली जातात हे विशेष.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय