“कोविड बाधित झाल्यानंतर काय काळजी घ्यावी” या विषयावरील वेबिनारचे पत्र सूचना कार्यालयाकडून आयोजन

मुंबई/नवी दिल्ली, 6 मे 2021 : कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत जनजागृतीसाठी देखील अनेक प्रयत्न केले जात आहेत . याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग संस्था, आणि बिट्स पिलानी संस्थेच्या गोवा शाखेच्या  वतीने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

“कोविड पॉझिटीव्ह आहात, मग पुढे काय?” हा वेबिनारचा विषय होता. यात राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक डॉ. सोमशेखर, बिट्स पिलानी, गोव्याचे संचालक प्रा. रघुराम जी, राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे सल्लागार डॉ. विनीत कुमार चड्डा,  याच संस्थेच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सी. रवीचंद्र आणि संस्थेच्या डॉ. ममता एच. जी. या तज्ज्ञांनी वेबिनार मध्ये मार्गदर्शन केले.

कोविड 19 चा संसर्ग झाल्यास काय आणि कशी काळजी घ्यावी याबाबत त्यांनी वेबिनारमध्ये उपयुक्त महिती दिली.

ज्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर नाही, त्यांनी आपला तळहात आपल्या छातीवर ठेऊन, 1 मिनिटांसाठी आपल्या श्वसनाचा दर मोजावा, जर तो 24 पेक्षा कमी असल्यास, ठीक आहे, 24 पेक्षा जास्त असल्यास, मध्यम आहे आणि 30 पेक्षा जास्त असल्यास, हा गंभीर आजार असू शकतो, असे डॉ. सोमशेखर यांनी यावेळी सांगितले.

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी ही  बाहेर फिरु नये, असे प्रा. रघुराम यांनी नमूद केले.

24% संसर्ग लक्षणविरहीत रुग्णांमार्फत संक्रमित होतो तसेच ज्या रुग्णांमध्ये उशीराने लक्षणे आढळतात त्यांच्यामार्फत 35% संक्रमण होते असे डॉ. रवीचंद्र म्हणाले. कोविड 19 रुग्णांसाठीच्या  रुग्णालयातून घरी सोडण्याविषयक  नवीन धोरणा विषयी यावेळी  डॉ.रवीचंद्र यांनी विस्तृत माहिती दिली. सौम्य लक्षणे रुग्णांना 10 दिवसानंतर/ सलग 3 दिवस ताप नसल्यास सोडावे, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना 3 दिवस ताप नसल्यास आणि बाहेरून ऑक्सिजनचा आधार घेण्याची आवश्यकता नसल्यास सोडावे असे त्यांनी सांगितले. कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांनी दैनंदिन आरोग्य तपासणी करावी, जसे श्वसन, ऑक्सिमीटरच्या सहाय्याने पल्सरेट मोजणी करावी असे डॉ. रवीचंद्र यांनी सांगितले. सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी RT-PCR चाचणी गरजेची नाही असे ते म्हणाले.

कोविड विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आपल्याला वेळेवर आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची आवश्यक्यता असल्याचे डॉ. विनीत चड्डा यांनी स्पष्ट केले. कोविड19 बाधित झाल्यास काळजी घेताना गृह अलगीकरण, खेळती हवा असलेल्या व इतरांशी संपर्क येणार नाही अशा खोलीत राहणे, कोविड उचित वर्तनाचे पालन करणे, इत्यादी गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बरेच लोक मास्क व्यवस्थित वापरत नाहीत. कोविड 19 विरूद्धच्या लढाईत मास्क हे सर्वात उपयुक्त शस्त्र आहे. मास्क कसा वापरावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची हे आपल्याला माहित असले पाहिजे, असे डॉ. विनीत चड्ढा यांनी स्पष्ट केले.  मास्क वापरताना योग्य काळजी घेणे महत्वपूर्ण असून त्यासाठी घर आणि ऑफिससाठी स्वतंत्र मास्क वापरणे, मास्क थेट एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर न ठेवणे, N95 मास्क साबण/डिटर्जंटने न धुणे, N95 मास्कची विल्हेवाट लावताना विशेष काळजी घेणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केला पाहिजे असे डॉ. विनीत चड्ढा म्हणाले.

अद्याप लस घेतलेली नसेल आणि आपण COVID19 बाधित झाले असल्यास आपण आपले लसीकरण त्यानंतर  3 ते 4 आठवड्यानंतर करू शकता. तसेच लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आपण COVID बाधित झाले असल्यास त्यातून बरे झाल्यानंतर 4 आठवड्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा असे डॉ. विनीत चड्ढा यांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर  विविध वस्तूंचे निर्जंतुकीकरण अतिशय महत्वाचे आहे असे मत डॉ. ममता एच. जी. यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणू हा वस्तू, कचऱ्यामध्ये 72 तास जिवंत राहतो. त्यामुळे मास्क, ग्लोव्हज, रुग्णांसाठी वापरलेली डिस्पोजेबल प्लेटस यांची योग्य रितीने विल्हेवाट लावावी तसेच पीपीईचा पुनःवापर टाळावा असे डॉ. ममता एच. जी.यांनी सांगितले.

वेबिनारमध्ये श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. आरटीपीसीआर चाचणी, सीटी स्कॅन, लसीकरणाची पहिली आणि दुसरी मात्रा, पहिली मात्रा घेतल्यानंतर झालेल्या संसर्गावर कशी मात करायची याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या उपसंचालक डॉ प्रियंका चरण यांनी कार्यक्रमाचे संचलन केले तर पत्र सूचना कार्यालय गोवाचे उपसंचालक विनोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

PPT presented by Dr. C. Ravichandra can be accessed here

PPT presented by Dr. Vineet Kumar Chadha can be accessed here

PPT presented by Dr. Mamatha H.G can be accessed here