September 24, 2025

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने विशेष महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. २४ जानेवारी, २०२४ : पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने उद्या गुरुवार दि. २५ जानेवारी ते रविवार दि. २८ जानेवारी दरम्यान एका विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रायोगिक रंगभूमीचे अवकाश आणखी विस्तारणाऱ्या आणि या रंगभूमीला नवा आयाम देणाऱ्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाशची उभारणी महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवाराच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटनाचे औचित्य साधत सदर महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.

या महोत्सवाअंतर्गत नाट्य, नृत्य, संगीत आणि दृश्यकला या चार कलाप्रकारांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असून सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी. नोंदणी करण्यासाठी ९६०८०८८००८ या क्रमांकावर तुमचे नाव, तुम्ही येऊ इच्छित असलेल्या प्रयोगाचे नाव, आणि तिकिटांची संख्या व्हॉटस अप द्वारे कळवावीत असे आवाहन महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रम हे हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह आणि श्रीराम लागू रंग अवकाश या ठिकाणी संपन्न होणार आहेत.

या महोत्सवा अंतर्गत गुरुवार दि. २५ जानेवारी रोजी सायं ६.३० वाजता पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स यांच्या सहकार्याने चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चित्रांच्या प्रिंट्सचे ‘व्यक्त आणि अव्यक्त’ हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे आणि चित्रकार, लेखिका विद्या डेंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यानंतर ‘गायतोडेंची चित्रकला- एक पुनर्भेट’ हा कार्यक्रम संपन्न होईल. ५ मार्च पर्यंत सकाळी १० ते सायं ८ दरम्यान हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह या ठिकाणी हे प्रदर्शन असणार आहे.

दि. २६ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नर्तक ऋषिकेश पवार यांचे उपचारात्मक नृत्यावर आधारित नृत्य प्रात्यक्षिक व व्याख्यान होईल. दुपारी ३ ते ६ या वेळेत कथक गुरु शमा भाटे यांच्या शिष्यांचा ‘नृत्य काव्य’ हा कार्यक्रम संपन्न होईल. याच वेळी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत शमा भाटे यांची शिष्या आणि कथक नृत्यांगना अमीरा पाटणकर आणि भरतनाट्यम गुरु डॉ स्वाती दैठणकर यांची शिष्या नुपूर दैठणकर या दोघी नृत्य प्रशंसा सत्र सादर करतील. याच दिवशी सायं ७ वाजल्यापासून गुरु शमा भाटे यांची संकल्पना असलेला आणि त्यांनी नृत्यदिग्दर्शन केंलेला ‘चतुरंग की चौपाल’ या कथक नृत्याच्या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होईल.

शनिवार दि. २७ जानेवारी रोजी सायं ५ वाजता डॉ श्रीराम लागू याच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘श्रीराम लागू प्रयोग -प्रभाव’ हा कार्यक्रम होईल. यामध्ये प्रतिमा कुलकर्णी, शुभांगी गोखले, अतुल पेठे, सुहास जोशी आणि विजय केंद्रे सहभागी होतील. यानंतर ‘तो राजहंस एक’ या नाटकाचा प्रयोग होईल.

रविवार २८ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता सुप्रसिद्ध चित्रकार युसुफ यांचे ‘भारतीय अमृत कला और मै’ या विषयावर व्याख्यान होईल. याच दिवशी सायं ७ वाजता सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.

या नंतरच्या आठवड्यात दि. २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने आयोजित केलेल्या भारत रंगमहोत्सवातील पाच नाटके श्रीराम लागू रंग अवकाश येथे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये दि. २ फेब्रुवारी रोजी लैला मजनू (हिंदी), दि. ३ फेब्रुवारी रोजी ‘द नाईट्स’ (हिंदी), दि. ४ फेब्रुवारी रोजी ‘अनिकेत संध्या’ (बंगाली), दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘डार्विन’ (मराठी), दि. ६ फेब्रुवारी रोजी पारिजात (कन्नड) या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. हे सर्व नाट्यप्रयोग रोज सायंकाळी ७.३० वाजता होतील. याही प्रयोगांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून आगावू नोंदणी आवश्यक आहे याची कृपया नोंद घ्यावी.

वर नमूद सर्व कार्यक्रमांची नोंदणी करण्यासाठी ९६०८०८८००८ या क्रमांकावर तुमचे नाव, तुम्ही येऊ इच्छित असलेल्या प्रयोगाचे नाव, आणि तिकिटांची संख्या व्हॉटस अप द्वारे कळवावी. यानुसार जास्तीत जास्त दोन तिकीटे तुम्हाला व्हॉटस अप द्वारे उपलब्ध करून दिली जातील, याची कृपया नोंद घ्यावी.