पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचे तबलावादन यांनी जिंकली पुणेकरांची मने

पुणे,  03 डिसेंबर 2022 : प्रदीर्घ काळानंतर आता परिस्थिती पूर्ववत होत असताना पुणेकरांची आजची संध्याकाळ ही सांगीतिक स्वरांनी आणि उस्ताद जाकीर हुसेन यांच्या अद्वितीय अशा तबलावादनाने भरून गेली. निमित्त होते ‘सा’ व ‘नी’ सुरसंगीत संस्थेतर्फ आयोजित ‘अमृत संगीत’ उत्सवाचे. उस्ताद जाकीर हुसेन यांसाठी पुणेकरांची गर्दी आज लोटलेली पहायला मिळाली.
पद्मश्री व संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी मारवा रागाने आपल्या गायनप्रस्तुतीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ‘तुम्हरे साजन…’ ही रचना सादर केली. त्यांना तबल्यावर उस्ताद जाकीर हुसेन यांनी साथ दिली.
माझ्यासाठी आजचा कार्यक्रम हा स्पेशल आहे, कारण आमचे मोठे बंधू आणि गुरू जाकीरभाई मला साथ द्यायला तयार झाले आहे असे सांगत पंडित कशाळकर म्हणाले, “जाकीरजींनी माझ्याबरोबर तबलावादन करायची तयारी दाखविली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. शिवाय ते मला सांभाळून घेतील असे आश्वासन त्यांनी दिल्याने मी निर्धास्तपणे माझे गायन सादर करतोय.”
यानंतर पंडित कशाळकर यांनी ‘गुनीजन मिल…’ हा ख्याल आणि तीन तालातील तराणा सादर केला. त्यांनी प्रस्तुत केलेल्या ‘तुम्ही सन लागी…’ या बंदिशीचे सर्वांचीच वाह वाह मिळवली. राग खमाजमधील तीन तालातील ‘हां कोयलिया कूक सूनाये, सखी री मैका बिरहा सतावे…’ या बंदिशीचे पंडित कशाळकरांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला
पंडित उल्हास कशाळकर यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर तर सौरभ नाईक व अद्वैत केसकर यांनी तानपुरा साथ केली.
माजी क्रिकेपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते पंडित उल्हास कशाळकर आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचा सत्कार करण्यात आला. ‘सा’ व’ नी’ चे संस्थापक सुरेंद्र मोहिते या वेळी उपस्थित होते. संगीत, नृत्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच पुणेकर रसिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.