महोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये कर्नाटक संगीताचे प्रवर्तक संत पुरंदरदासांचे जीवनचरित्र, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या रचनांमागील विचार उलगडणारे ‘दासरेदरे पुरंदरदासा’ हे नृत्यनाट्य सादर झाले. त्यानंतर भारतातील काही निवडक अप्रचलित स्वातंत्र्ययोधिनींचे बलिदानाचे चित्रण शिल्पा देशमुख यांनी भरतनाट्यम मार्गम स्वरूपात उपस्थितांसमोर सादर केले. या नृत्य नाट्याचे शब्द संगीत गुरु स्मिताताई यांचे होते तर त्याला गायनाची साथ वर्षा, मृदंग साथ यशवंत हंपीहोली तर बासरीवर संजय यांनी साथसंगत केली.
पॅनोरमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गुरु स्मिता महाजन आणि त्यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम नृत्यशैलीच्या परंपरागत रचनेनुसार मार्गम, जतिस्वरम, शब्दम, वर्णम,पदम आणि तिल्लाना अशा क्रमाने सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वतः स्मिता महाजन यांनी आई आणि मुलगी, या नात्यातील कालातीत वात्सल्यभावाचे अनोखे भावदर्शन पदम् च्या माध्यमातून रसिकांना घडवले. ‘रागावू कशी तुला लाडके’, असे शब्द असणारे हे पद स्मिता महाजन यांनी स्वतः रचलेले, संगीतबद्ध, नृत्यसंरचनाबद्ध आणि अर्थातच अभिनित केले होते. या सादरीकरणातील स्मिताताईंचा अभिनय, त्यातील सूक्ष्मता, आई आणि मुलगी यांच्यातील क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भूमिका, त्यानुरूप देहबोली हे सारेच अनुभवण्याचे विषय होते. या सर्व सादरीकरणासाठी सौम्या आर्या (गायन), यशवंत हंपीहोली (मृदंगम), बी अनंतरामन (व्हायोलीन), कीर्ती ठेंबे (नटुअंगम) यांनी पूरक साथ केली.
महोत्सवाच्या चौथ्या सत्राची सुरुवात ‘देवी’ या नृत्यनाटिकेने झाली. सती, पार्वती, अर्धनारी, जगन्माता आणि महिषासुरमर्दिनी या पाच रूपांचे दर्शन यात घडले. त्यानंतर ‘नृत्य गीताई’ या पल्लवी नाईक यांच्या नृत्यानाटीकेत कृष्णाची भूमिका गुरू स्मिताताई यांनी निभावली. विश्वरूप दर्शनाचे गूढ अर्जुनापुढे उलगडणारा कृष्ण आणि त्याच्या असाधारणतेने अचंबित अर्जुन हे दृश्य पाहून सभागृह भारावून गेले होते.
अलका लाजमी यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे निवेदन गौरी स्वकुळ यांनी केले.

More Stories
Pune: आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड
लोकमान्यनगर पुनर्विकासावर संताप; “मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाचा अहवाल नाही, रहिवाशांवर अन्याय”
Pune: मुरलीधर मोहोळ जिल्हा प्रभारी, गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख