पिंपरी चिंचवड: “माझी मिळकत, माझी आकारणी‘ योजनेचे नवीन क्रांतिकारी पाऊल

पिंपरी, ०६ मे २०२२ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये ब-याच मिळकती नव्याने उभारण्यात आल्या असून कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे काही नव्याने उभारण्यात आलेल्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही. कोरोना साथरोगाच्या कालावधीमध्ये महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. ज्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणी करण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या नवीन अथवा वाढीव बांधकाम झालेल्या मिळकतींची कर आकारणी अद्याप झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणीसाठी जर मिळकतधारक स्वयंस्फूर्तीने स्वत: बांधकामांची नोंद करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्ज करत असेल तर अशा नागरिकांना प्रोत्साहन व मिळकतकरामध्ये महापालिकेकडून ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मा. राजेश पाटील यांनी दिली आहे. ही योजना गेल्या वर्षी लागू केलेली असली तरी या योजनेचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. स्वतः आकारणी करून स्वतःच ती आकारणी अंतिम टप्प्यापर्यंत नेणे हे या योजनेतील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल आहे. लोकशाहीमध्ये लोकांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे असते. लोकांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेऊन प्रशासकीय यंत्रणा प्रतिसादशील व गतिमान करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले.

 

मालमत्ता कर हा नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत आहे. स्थानिक नगरपालिका संस्था काही महत्वाच्या सेवा-सुविधा पुरवतात. मालमत्ता कर हा महानगरपालिका संस्थांना ती प्रदान करत असलेल्या सर्व सेवा सुविधांसाठी महसूल मिळवून देतो. महानगरपालिका संस्थांच्या उत्पन्नाचे हे प्रमुख स्त्रोत आहे. म्हणून अचल मालमत्तेच्या मालकांना कर पात्र मूल्यावर कर भरणे अनिवार्य असते आणि मालमत्ता कर भरला नाही तर देय वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

 

महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १२७ व १२९ नुसार करआकारणी करण्यात येते. तसेच, अनुसुची ड प्रकरण ८ नियम ७ (१) अन्वये त्या- त्या आर्थीक वर्षातील प्रचलित प्रती चौरस फुट दराने मिळकतीने करयोग्य मुल्य निश्चित करण्यात येते. सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना काळात अनेक बांधकामे नव्याने झाल्याचे निदर्शनास आले आहेत, अशा मिळकतींची कर आकारणी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेत जलद प्रक्रीयेसाठी व नागरिकांच्या मालमत्तेची नोंद व्हावी, याकरीता महापालिकेमार्फत “माझी मिळकत माझी आकारणी” ही योजना राबविण्यात येत आहे. कर किती व कसा आकारला जातो, याबाबत नागरिकांना माहीती नसल्याने मालमत्तेची नोंदणी होत नाही. त्यामुळे कर रुपातून महापालिकेचे नुकसान होते. सदरचे नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागृती आणण्यासाठी “माझी मिळकत, माझी आकारणी” ही योजना उपयोगी ठरणार आहे.

या योजनेद्वारे करदात्याला सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतः च्या मिळकतीची आकारणी स्वतः च करता येणार आहे. एवढेच नाही तर कर आकारणी मान्य असल्यास लगेचच मिळकत कर भरता येणार आहे. सदर कर भरल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत भौतिक सर्वेक्षण म्हणजे प्रत्यक्ष मोजमाप करण्यात येते आणि त्या सर्वेक्षणच्या आधारे संबंधित अर्जानुसार कर आकारणी केली जाते. या पद्धतीमध्ये जाणारा वेळ, होणारी दिरंगाई टाळण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल महापालिका उचलत आहे. मे / जून महिन्यात पथदर्शी स्वरुपात ही योजना राबविण्यात येणार आहे.

 

कर आकारणी न झालेल्या मिळकतींचे मिळकतधारक महापालिकेचे संकेतस्थळावर अथवा स्वत: नोंदणीसाठी अर्ज करत असेल, तर अशा मिळकतधारक / नागरिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १४० मधील तरतूदीनुसार यापुढे नवीन करआकारणी होणा-या मिळकतीचे प्रकरणी ज्या वर्षात करआकारणी कायम होईल. त्या आर्थिक वर्षाच्या चालू मागणीतील मिळकतकर बिलामधील सामान्य करात ५ टक्के पहिल्या वर्षाकरिता अटी व शर्तींच्या अधीन सवलत देण्यात येईल. यामध्ये, मिळकतधारकाने स्वत: www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावरील शिघ्रगणकाद्वारे मिळकतकराच्या नोंदणीसाठी अर्ज करून करआकारणी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या सेवेमुळे कोणत्याही मिळकत करदात्याला, नागरिकांना स्वतःच्या नवीन मिळकतीची, मिळकतीच्या बदलाची किंवा वापरातील बदलाची नोंद स्वतःहून करता येणार आहे. या बदलाची नोंद मिळकत करदात्याने केल्यानंतर सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे. तसेच या मिळकतीची नोंद महापालिकेच्या करआकारणी रजिस्टरला देखील होणार आहे. हा उपक्रम कदाचित देशातील पहिला उपक्रम असेल.

 

मिळकतीचे मूल्यमापन करणे आणि कर संकलन करणे हे मिळकत कर विभागाचे प्रमुख काम आहे. हा विभाग नागरिक केंद्री असल्याने संपूर्णत: नागरिकांचे सहकार्य आणि सहभागावर अवलंबून आहे. अधिकाधिक सुलभ सुविधा देता याव्यात यासाठी मिळकत कर विभागामार्फत नागरीकांना सातत्याने नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकामार्फत “माझी मिळकत माझी आकारणी” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 

 

अशी करावी लागणार ऑनलाईन नोंदणी….

 

मिळकतधारकाने स्वत: मिळकतकराच्या नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावरील “नागरिक” या टॅबवर क्लिक करून त्यातील “माझी मिळकर माझी आकारणी” पेज उघडावे. त्यानंतर, “न्यु असेसमेंट” हा पर्याय निवडावा. त्यातील “सेल्फ असेसमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स” हा संपूर्ण फार्म भरावयाचा आहे. त्यामध्ये, मिळकत धारकाचे नाव, आधार नंबर, पॅन नंबर, मोबाईल, मेल आयडी, सर्वे नंबर, प्लॅट नंबर अँड बिल्डींग नंबर, जागेची ओळख, परिसराचे नाव, पिन कोड आदी माहिती भरून “same as above” वर क्लिक करून मिळकत असलेले क्षेत्रिय कार्यालय निवडायचे आहे. त्यानंतर, मिळकतींचा प्रकार नमूद करून पार्किंग एरिया या पर्यायावर “होय किंवा नाही” यावर क्लिक करायचे आहे. तसेच, मिळकतींचा वापर, बांधकाम प्रकार, क्षेत्र, स्वे. फुट, वार्षिक दर, वार्षिक दर करण्यायोग्य मूल्य, दस्तऐवजानुसार संपत्तीचा वापर सुरू करण्याची तारीख आदी माहिती भरून तपशील जोडायचा आहे. तात्पुरती मालमत्ता कर यावर क्लिक करून नेक्ट बटन दाबल्यानंतर अर्ज भरला जाईल.

 

अर्ज भरल्यानंतर महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मेलद्वारे विशेष नोटीस काढण्यात येते. विशेष नोटीस मान्य असल्यास कर आकारणी मान्य होऊन payment option येतो. यामध्ये अर्ज क्रमांक हाच तात्पुरत्या स्वरुपात property id असतो. नंतर संबंधित विभागामार्फत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून नवा property id दिला जातो. कर आकारणी अमान्य असल्यास पुढील सुनावणीची प्रक्रिया पार पाडण्यात येते.