पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी कृती दल स्थापन

पिंपरी, दि. २० मे २०२१ :- राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण समितीने दिलेल्या आदेशानुसार, करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना योग्य संगोपन मिळावे, यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे कृती दल गठीत करण्यात आला आहे.

करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेकरीता जिल्हा स्तरावर कृती दल गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वतीने कृती दल गठीत करण्यात आला असुन, या दलातर्फे अशा अनाथ बालकांची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे प्रभारी अतिरीक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दलाचे सदस्य उपायुक्त अजय चारठणकर व सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कृती दलाची बैठक नुकतीच संपन्न झाली.

महापालिका क्षेत्रातील करोना या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती समन्वय अधिका-यांस उपलब्ध करून देण्यात यावी. करोना उपचाराकरिता रुग्णाला दाखल करते वेळी गरज पडल्यास आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णालयाकडून भरून घेण्याबाबत महापालिका क्षेत्रातील सर्व रूग्णालयांना निर्देश दिले आहेत.

याबाबत नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन नंबर ८८८८००६६६६ या क्रमांकावर तसेच sarathi@pcmcindia.gov.in या ईमेलवर ईमेलद्वारे किंवा महाराष्ट्र शासनाच्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर माहिती देवून सहकार्य करावे असे आवाहन महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.