पिंपरी- शहरवासीयांनी छोट्या प्रवासासाठी सायकलचा वापर करावा, महापौर उषा ढोरे यांचे प्रतिपादन; फुटपाथ व सायकल ट्रॅक विकासाच्या कामाचे महापौर ढोरे यांनी केले उदघाटन

पिंपरी, १९ ऑगस्ट २०२१ – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलिंग आवश्यक असून त्याचा वापर शहरवासियांनी छोट्या प्रवासासाठी करावा असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.  

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते एम.एम. शाळेपर्यंतच्या बीआरटी मार्गावरील फुटपाथ व सायकल ट्रॅक अत्याधुनिक पध्दतीने विकसीत करण्याच्या कामाचे उद्घाटन तापकीर चौक येथे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य चंद्रकांत नखाते, नगरसदस्या सुनिता तापकीर, निता पाडाळे, सविता खुळे, स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, सामाजिक कार्यकर्ते कैलास सानप, राजू तापकीर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
 
महापौर माई ढोरे म्हणाल्या या भागातील पादचा-यांच्या सुरक्षा आणि सोईकरीता नवीन डिझाईननुसार सुरक्षित ये जा करण्यासाठी फुटपाथ तयार करण्यात येणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे.  त्याचा उपयोग सायकलस्वारांना होईल.  त्यातून जनतेस प्रदुषण मुक्ततेसाठी संदेश देखील जाईल असे सांगितले.  तसेच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या “सायकल फॉर चेंज” या उपक्रमात ११० शहरे सहभागी झाली होती.  त्यामध्ये पिंपरी चिंचवड  शहराचा देशात ७ वा क्रमांक आलेला असल्याने केंद्र सरकारने महापालिकेस नुकतेच १ कोटी रूपये बक्षिस जाहीर केल्याचीही माहिती महापौर माई ढोरे यांनी सांगितली.


 
यावेळी प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य चंद्रकांत नखाते, नगरसदस्या सुनिता तापकीर, सविता खुळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 


 या उपक्रमांची माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली त्यानुसार  रस्त्याची लांबी १६०० मीटर असून रुंदी ४५ मीटर असणार आहे. दोन्ही बाजूला ३ मीटरचा पदपथ, दोन्हीबाजूला १.५ मीटरचा सायकल ट्रॅक तसेच दोन्ही बाजूस २ मीटरचे समांतर पार्किंग असणार आहे आणि दोन्ही बाजूला मोटार व्हेईकल तसेच हॉकर्स झोन ठेवण्यात येणार असून या कामासाठी १८ महिने लागणार असून याकामी १६ कोटी ८६ लाख इतका खर्च येणार असल्याचीही माहिती ओंभासे यांनी दिली.


 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्या सुनिता तापकीर यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी मानले.