पिंपरी चिंचवड : ऑक्सिजनची गरज असलेल्यांना ऑक्सिजन काँन्सँट्रेटर मशीनद्वारे घरीच मिळणार ऑक्‍सिजन

पिंपरी, २७ मे २०२१: घरीच उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या गरजू रुग्णांसाठी महापालिकेकडील ऑक्सिजन काँन्सँट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरातील काही उद्योजकांनी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून, महापालिकेला ऑक्सीजन मशीन दिले आहेत. त्याची सेवा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. त्यासंदर्भातील सूचना महापौर माई ढोरे व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधितांना केल्या आहेत.

गरजू रुग्णांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. मशीन वापरण्या संदर्भात प्रशिक्षण व माहिती संबंधितांना देण्यात येणार आहे. मात्र हे मशीन वीजेवर चालत असल्याने, वीज पुरवठा खंडित झाल्यास, त्याचा रुग्णावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी ऑक्सीजन सिलेंडर जवळ ठेवण्याची जबाबदारी, रुग्णांची असणार आहे. या कालावधीत वेळोवेळी, ऑक्सिजनची तपासणी व तज्ञ डॉक्टरांशी संपर्क ठेवण्याचीही जबाबदारी रुग्णांची असेल. पंधरा दिवसांनी रुग्णाला, ऑक्सिजनच्या आवश्यकतेच्या बाबतची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतर मशीन कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्याकडे जमा करावयाचे आहे.

ऑक्सिजनची गरज असणाऱ्या सामान्य रुग्णांनी महापालिकेच्या 77 68 00 58 88 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा .असे महापालिकेच्या प्रवक्ता शिरीष पोरेडी यांनी कळविले आहे.