प्रधानमंत्री यांच्याकडून ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत लाभ जाहीर

पुणे, दि. 30/5/2022: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत लाभ जारी केले. यावेळी त्यांनी कोविड-19 मुळे पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या देशभरातील बालकांशी संवाद साधताना संपूर्ण देशाच्या संवेदना या बालकांसोबत असून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व ते सहाय्य करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला.

 

दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्रीपरिषदेचे अन्य सदस्य आणि राज्यांचे मुख्यमंत्री ऑनलाईनरित्या उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेली 106 बालके या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाशी जोडली गेली.

 

कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांच्या जीवनातील अडचणींबद्दल सहानुभूती व्यक्त करताना प्रधानमंत्री म्हणाले, ‘कोविडमुळे आई आणि वडील दोघेही गमावलेल्या मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ हा एक छोटासा प्रयत्न आहे. हा निधी म्हणजे प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने तुमच्या पाठीशी आहे याचेही एक प्रतिक आहे.

 

एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची गरज असेल तर अशा परिस्थितीतही पीएम-केअर्स मदत करेल. इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य योजनांद्वारे दरमहा ४ हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या 23 वर्षांनंतर मुलांना 10 लाख रुपये रोख मिळणार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्यादृष्टीने आयुष्मान भारत कार्ड वितरीत करण्यात येत आहे. मानसिक आणि भावनिक मदतीसाठी ‘संवाद हेल्पलाइन’द्वारे भावनिक समुपदेशन दिले जाईल.

 

साथीच्या रोगाच्या वेदनादायक परिणामाला धैर्याने तोंड दिल्याबद्दल तुम्हाला सलाम करतो, असे वक्तव्य करुन पंतप्रधान मुलांना म्हणाले की, ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’च्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. निराशेच्या अंधकारमय वातावरणातही जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रकाशाचा किरण नक्कीच दिसतो. निराशेचे रूपांतर पराभवात होऊ देऊ नका, असा सल्ला पंतप्रधानांनी मुलांना दिला. आपल्या वडीलधाऱ्यांचे आणि शिक्षकांचे ऐकावे. या कठीण काळात चांगली पुस्तके त्यांचे विश्वसनीय मित्र ठरू शकतात, असेही ते म्हणाले.

 

*जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते 106 बालकांना पीएम-केअर्स योजनेच्या लाभाचे वितरण*

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 106 बालकांना योजनेच्या लाभाचे किट वितरीत करण्यात आले. यामध्ये 10 लाख रुपयांचे लाभ मिळाल्याचे पोस्ट खात्याचे पासबुक, पंतप्रधान यांचे ‘स्नेहपत्र’, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचे ‘आयुष्मान भारत’ योजनेचे कार्ड, प्रधानमंत्री यांच्या सहीचे पत्र, जिल्हाधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांच्यासह बालकांचे सध्याचे पालक, नातेवाईक, बालकल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.