महापालिकेची सुरक्षा कडक करण्यासाठी आयुक्तांचे आदेश

पुणे, 3/03/2022: महापालिकेत भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेची सुरक्षेचे पितळ उघडे पडले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वी मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश काढले आहेत. मुख्य इमारतीतील गर्दीला आवर घालण्यासाठी गेटपास शिवाय महापालिकेत कोणालाही प्रवेश देऊ नये, आवारात आंदोलन करता येणार नाही, तसेच नगरसेवक, माजी नगरसेवकांना नगर सचिव विभागाने ओळखपत्र द्यावेत यासह इतर सूचना केल्या आहेत.

 

पुणे महापालिकेच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर सुरक्षा व्यवस्था असली तरी त्याचा धाक नाही अशी अवस्था आहे. महापालिकेला सुट्टी असतानाही किरिट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर काही सुरक्षारक्षकांवर कारवाई झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य इमारतीच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली जात असताना आज महापालिका आयुक्तांनी आदेश काढले. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख पटवून द्यावी लागेल, त्याची नोंदही ठेवली जाणार आहे.

 

असे आहेत आदेश

– महापालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन व निदर्शने करता येणार नाहीत

– महापालिकेला सुट्टी असताना यादिवशी संबंधित खात्याच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.

– सुट्टीच्या दिवशी राजकीय कार्यक्रम असल्यास त्याबाबत प्रशासनाला पूर्वसूचना देणे आवश्‍यक आहे.

– मनपा कर्मचारी, अधिकाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे आहे.

– नगरसेवक, माजी नगरसेवक, स्वीकृत सभासद यांना नगरसचिव विभागाने ओळखपत्र द्यावेत

– मुख्य इमारतीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यांची नोंद येताना व जाताना ठेवावी

– महापालिकेत प्रवेश करताना गेटपास तयार करून घ्यावा लागेल. काम झाल्यानंतर त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी

– कामात कुचराई करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर विभागप्रमुखांनी त्वरित कारवाई करावी