पुण्यात लाचखोरीचे सत्र कायम, पुणे महानगरपालिकेच्या उपअभियंत्याला रंगेहात पकडले

पुणे, २३/०८/२०२१: भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचखोरीप्रकरणी सभापतींसह पाचजणांना अटक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर आज पुण्यातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या उपअभियंत्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी सुधीर विठ्ठलराव सोनवणे (वय ५१) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून त्यांनी २०१८-१९ मध्ये महानगरपालिकेच्या शाळा दुरूस्तीचे काम केले होते. कामाचे बील पास न झाल्यामुळे तक्रारदार उपअभियंता सुधीर सोनवणे यांना भेटले. बील मंजूर करण्यासाठी आणि दुसऱ्या कामाचे बील काढून दिल्याचा मोबादला म्हणून ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४० हजार रूपये लाच स्वीकारताना एसीबीने सोनवणे यांना रंगेहात पकडले आहे.