पुण्यातील रस्त्याची दुरवस्था, 11 ठेकेदारांना नोटीस

पुणे, २५ जुलै २०२२: कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची चाळण झाली. त्यानंतर महापालिकेवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. अखेर प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेवरून कारवाई निश्‍चिती सुरू केली आहे. शहरात गेल्या 3 वर्षांत 120 रस्त्यांची कामे केलेल्या 11 ठेकेदारांना खड्डे दुरुस्तीसाठी नोटीस बजावल्या आहेत. त्यातील फक्‍त चौघांनी रस्ते दुरुस्तीची तयारी दर्शविली असून उर्वरित 7 जणांनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही.

ठेकेदारांनी रस्ते दुरुस्तीस नकार दिल्यास, त्यांच्याकडून दुरुस्तीचा खर्च तसेच निकृष्ट कामाचा ठपका ठेऊन दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी माहिती दिली. “खड्डे पडण्यास पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागासही जबाबदार धरण्यात आले असून, त्यांनी वाहिन्या टाकल्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून गुणवत्तापूर्वक रस्ते दुरूस्ती केली नाही. असा ठपका ठेवत त्या ठेकेदारांवरही दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे,’ असे डॉ. खेमनार म्हणाले.
दरम्यान, रस्त्यांच्या दुरवस्थेनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्‍त डॉ. खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विकासकामांच्या ऑडिटसाठी नेमलेल्या इंजिनिअर इंडिया लिमिटेड या संस्थेस गेल्या तीन वर्षांत पावसाळ्यापूर्वी तसेच नव्याने केलेल्या रस्त्यांची कामे तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

ठेकेदार अन्‌ क्षेत्रीय अधिकारीही अडचणीत
रस्त्यांच्या दुरवस्थेप्रकरणी केवळ महापालिकेच्या पथ विभागास जबाबदार न धरता क्षेत्रीय कार्यालयांनाही आपल्या प्रभागाच्या हद्दीत खराब झालेल्या 12 मीटरच्या आतील रस्त्यांचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना देण्यात आलेली मुदत संपली असून त्यांच्या अहवालानुसार या कामांचीही पाहणी केली जाणार आहे. तर ही कामे निकृष्ट आढळून आल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्‍त विक्रम कुमार यांनी सांगितले.