महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या डीपीसाठी घेतली जाणार खास सभा 

पुणे, १२/०७/२०२१:महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी खास  सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून येत्या गुरुवारी १५ जुलैला ही खास सभा होणार आहे, अशी माहिती पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
पुणे महानगपालिकेच्या हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आल्याने शहराची हद्द मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना (एमआरटीपी) अधिनियम १९६६ च्या कलम २१ नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांचा विकास आराखडा पालिकेने तयार करावा, असा ठराव गेल्या आठवड्यात झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मांडून त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची मंजुरी देण्यासाठी पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर खास सभा बोलविण्यात यावी, अशी लेखी मागणी स्थायी समितीच्या आठ सभासदांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार १५ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता ही खास सभा आयोजित करण्यात आली आहे. दृकश्राव्य (ऑनलाईन) माध्यमातून ही सभा होणार आहे.